गमन चित्रपटातून कोकणकन्या हर्षिका मेळेकरची रुपेरी पडद्यावर दमदार भरारी;

 ‘तारा’च्या भूमिकेने वेधले लक्ष
जैतापूरच्या मातीतून रुपेरी पडद्यावर कोकणकन्येची झेप; ‘गमन’ चित्रपटातील ‘तारा’च्या भूमिकेने हर्षिका मेळेकरचे सिनेसृष्टीत पदार्पण

राजन लाड, जैतापूर :
रंगभूमी, शास्त्रीय नृत्य आणि कलेचे घरातून मिळालेले बाळकडू यांच्या जोरावर एका नवोदित कलाकाराने रुपेरी पडद्यावर पदार्पणातच स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. मूळची राजापूर तालुक्यातील जैतापूर गावची कन्या आणि सध्या मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथे वास्तव्यास असणाऱ्या हर्षिका संतोष मेळेकर हिने ‘गमन’ या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दमदार पाऊल ठेवले असून, तिने साकारलेली ‘तारा’ ही मध्यवर्ती भूमिका सध्या सिनेरसिकांच्या आणि समीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
हर्षिकाचे शालेय व उच्च शिक्षण मुंबईतच झाले असून विलेपार्ले येथील नामांकित डहाणूकर महाविद्यालयातून तिने ‘मास मीडिया आणि कम्युनिकेशन्स’ (BAMMC) ची पदवी पूर्ण केली आहे. घरात आई-वडील दोघेही शालेय तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य करतात, तर मोठी बहीण स्वतः अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. घरातूनच कलेचे समृद्ध वातावरण लाभल्याने आणि आई-वडिलांच्या कलाप्रेमामुळे हर्षिकाला लहानपणापासूनच नृत्याची आणि अभिनयाची तीव्र ओढ लागली. तिने भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार असलेल्या ‘भरतनाट्यम’चे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेऊन प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘अरंगेत्रम’ यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. महाविद्यालयीन जीवनात तिने एकांकिका, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि अनेक पथनाट्यांमध्ये आपल्या सशक्त अभिनयाची चुणूक दाखवली, तर आपल्या मोठ्या बहिणीसोबत एका डिजिटल जाहिरातीतही ती झळकली होती.
तिच्या याच अभिनय कौशल्याची दखल घेऊन दिग्दर्शक मनोज नाईकसाटम यांनी ‘गमन’ चित्रपटासाठी तिची निवड केली. या चित्रपटासाठी एका १४ ते १५ वर्षे वयोगटातील निष्पाप चेहऱ्याची गरज असताना हर्षिकाचे छायाचित्र दिग्दर्शकांच्या नजरेस पडले आणि त्यानंतर झालेल्या ऑडिशनमध्ये तिने आपल्या अभिनय क्षमतेच्या बळावर थेट ‘तारा’ या प्रमुख भूमिकेला गवसणी घातली.
मानसी नाईकसाटम निर्मित आणि नाईक साटम आर्ट्सचा हा चित्रपट केवळ कोकणातील रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतरापुरता मर्यादित नसून, महानगरात विस्थापित झालेल्या माणसांच्या भावविश्वाचा आणि मुळांशी जोडलेल्या नाळेचा एक संवेदनशील पट मांडतो. यात हर्षिकाने बिहारमधील पूरग्रस्त भागातून उपजीविकेसाठी मुंबईत आलेल्या ‘तारा’ या मुलीची अत्यंत जिवंत, आव्हानात्मक आणि हळवी भूमिका तितक्याच ताकदीने पडद्यावर जिवंत केली आहे.
२ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात हर्षिकासोबतच नारायण जाधव, श्रद्धा खानोलकर, सचिन वळूंज, दीपक कुमार आणि नीलेश पवार या मातब्बर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असून, चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कोकणच्या मातीशी नाळ जोडून रुपेरी पडद्यावर झळकलेल्या हर्षिकाच्या या यशाबद्दल तिचे मूळ गाव असलेल्या जैतापूरसह संपूर्ण राजापूर तालुक्यातून आणि सिनेसृष्टीतून तिच्यावर कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे.