राजापूर तालुका दुष्काळग्रस्त: पाणीटंचाईचे संकट, भातपिकही धोक्यात, बळीराजा हतबल

नरेंद्र मोहिते, राजापूर :
यावर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे संपुर्ण राज्यावर दुष्काळाचे संकट आहे. शासनाने राज्यात जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये राजापूर तालुका खरीप हंगामातील Trigger-1 (प्रथम कळ) दुष्काळग्रस्त म्हणून समावेश केला आहे. तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात पर्जन्यमानात लक्षणीय घट झाली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात केवळ सुमारे ६५ टक्के पाऊस झाल्याने तालुक्यात पाणीटंचाईची चिंता निर्माण झाली आहे. विशेषतः सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने नदी-नाल्यांची पाणीपातळी झपाट्याने खालावली आहे. त्यामुळे यावर्षी शहरासह ग्रामीण भागात भिषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच ऑक्टोबरच्या सुरूवातीपासूनच वाढलेले तीव्र तापमान पहात भुगर्भातील पाण्याच्या साठयावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असून त्यांचा परिणाम पाण्याच्या स्त्रोतांवर होणार आहे. त्यामुळे या पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी आत्तापासूनच प्रभावी उपाययोजनांची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनतेच्या सहभागातुन नक्कीच हे करणे शक्य असून त्यासाठी आत्तापासूनच नियोजन आवश्यक आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई आणि पिकांचे झालेले नुकसान यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. या संकटातुन बाहेर काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि शासनाच्या मदतीची अपेक्षा आहे.
शासनाच्या महावेध संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबरपर्यंत राजापूर तालुक्यात अपेक्षित पावसाच्या केवळ ६५.४७ टक्के पाऊस झाला आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीतही अपेक्षेपेक्षा कमी पाऊस नोंदविण्यात आला. जून ते ऑगस्ट दरम्यान तालुक्यात सरासरी ३०६८.७ मि.मी. पर्जन्यमान अपेक्षित असताना प्रत्यक्षात २०८५.२ मि.मी. पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली. या महिन्यात सरासरी ३८८.६ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना ३० सप्टेंबरपर्यंत केवळ १७८.३ मि.मी. पाऊस झाला. म्हणजेच सप्टेंबरमध्ये अपेक्षित पावसाच्या तुलनेत सुमारे ४५.९ टक्केच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या पावसाच्या तुलनेत यंदा पर्जन्यमानात मोठी घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
याचा परिणाम जलपुरवठयावर झाला आहे, पावसाने ओढ दिल्याचा थेट परिणाम तालुक्यातील नदी-नाल्यांवर झाला आहे. कोदवली नदीपात्रात सप्टेंबरमध्येच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले असून धरणक्षेत्रातील पाण्याची उपलब्ध पातळीही चिंताजनक बनली आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.तर ग्रामीण भागातील नद्या नाल्यांच्या पाण्याची पातळीही खालावली असून विंधन विहिरी, तळी यांतील पाण्याची पातळी खालावली आहे. याचा परिणाम पुढील जून पर्यंत जाणावणार आहे. त्यातच परतीचा पाऊस पडेल आणि काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना परतीच्या पावसानेही राजापूरकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यावर्षी कमी झालेल्या पावसाने तालुका वासीयांच्या तोंडचे पाणी आत्तापासूनच पळाले आहे. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे नियोजन हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद तसेच ग्रामपंचायतींनी आतापासूनच आवश्यक नियोजन आणि उपाययोजना करण्याची गरज आहे.
यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे राजापूर तालुक्यातील जलस्रोत, शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची चिन्हे दिसत असून प्रशासनाने वेळीच खबरदारी घेणे आवश्यक ठरणार आहे. राजापूर नगर परिषदेसह तालुक्यात असलेल्या १०१ ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठयाच्या विविध योजना व स्त्रोत आहेत, मात्र प्रत्यक्षात पाऊस कमी झाल्याने या पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांवरच थेट परिणाम होणार असल्याने राजापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक गाव व वाडीवस्तीवर टँकरनेही पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनही आत्तापासून याबाबतचे नियोजन हाती घेतले आहे.
भात आणि नाचणी पिकांवर परिणामाची भीती
पाणीटंचाईचे संकट तीव्र आहेच, पण या कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे भात पिकासह अन्य पिकांनाही फटका बसला आहे. राजापूर तालुक्यात यंदा सुमारे ६२१२.६० हेक्टर भात आणि ६०८ हेक्टर नाचणीचे पीक आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भात पिकावर परिणाम झाला असून भात पिक करपले आहे. दुष्काळी तालुक्यात राजापूरचा समावेश झाल्याने प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे हाती घेण्यात आले आहेत. तालुक्यात ८१ गावांतील १,१२८ शेतकऱ्यांच्या ३५३.१५ हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  कृषी, महसूल आणि ग्रामपंचायत यंत्रणेच्या संयुक्त पथकांकडून शेताच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची नोंद केली जात आहे. तालुक्यातील २३७ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र असल्याने निर्धारित कालावधीत पंचनामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. तालुक्यात सुमारे ७ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर भातशेती करण्यात आली असून, त्यापैकी सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यामध्ये सुमारे २५ हजार शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. कमी पावसामुळे भातशेतीसह नाचणी, वरी आदी पिकांवरही परिणाम झाला आहे. तर यावर्षी आंबा व काजू पिकालाही या दुष्काळाचा फटका बसणार आहे. त्यामुळे यावर्षी तीव्र पाणीटंचाईबरोबरच पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला याचा सामना करावा लागणार आहे.
मात्र यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थांसह जनतेच्या सहयोगातुन विविध उपाययोजना केल्या, शासनाने विशेष लक्ष देत टंचाई निवारणार्थ भरघोस निधी दिला, आणि आपदग्रस्त शेतकऱ्यांना योग्य प्रकारे चांगला असा आर्थिक मोबदला दिला तर मात्र दुष्काळाच्या झळा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.