सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा
स्वप्निल कदम- कुडाळ : कमी वयात मिळालेले आई-वडिलांचे संस्कार आणि चांगल्या मित्रांची संगत आयुष्याला योग्य दिशा देणारी ठरते. युवा उद्योजक शिवम म्हाडेश्वर हे गेल्या अनेक वर्षांपासून आपला वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करत आहेत. त्यांच्या नियोजनाखाली माठेवाडा मित्र मंडळ व प्रभावळकर वाडा मित्र मंडळाच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत.
यावर्षीही शिवम म्हाडेश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ गांधी चौक येथील स्टँडसमोरील चौकात नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. मिशन आधार सिंधुदुर्ग संस्थेच्या ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’ या अभियानाला पाठबळ देत हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मिशन आधार सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष सम्राट कुडतरकर यांनी प्लास्टिकच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. समाजात कॅन्सरसह विविध आजारांचे प्रमाण वाढत असून पर्यावरणाच्या दृष्टीनेही प्लास्टिकचा अतिवापर घातक आहे. ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’ ही चळवळ उभी करणे सोपे असले तरी ती यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून या अभियानात सहभागी व्हावे आणि जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हाप्रचारक वैभव पाटील, कुडाळ हायस्कूलचे शिक्षक जी. बी. शिरसाट, कैवल्य म्हाडेश्वर, प्रथमेश कांबळी, अरविंद करलकर, रोहित भोगटे, मयूर कुडतरकर, अनिस सावंत, जितेंद्र यादव, तन्मय सावंत, नितीन सोलकर, मंदार सावंत, कौस्तुभ राठोड, अन्वी सावंत, नमिता बिडये, जयराज म्हाडेश्वर, रोहित सावंत, आकाश नाईक, साई तळवणेकर, हर्षद कुडतरकर तसेच माठेवाडा मित्र मंडळ व प्रभावळकर वाडा मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवम म्हाडेश्वर यांचे मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवम म्हाडेश्वर यांनी आपल्या मनोगतात, आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, त्यामुळे प्रत्येकाने समाजासाठी योगदान दिले पाहिजे, असे सांगितले. मिशन आधार संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून निःस्वार्थपणे सामाजिक कार्य केले असून ‘प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग’ चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये मित्रमंडळींचे मोठे योगदान असून त्यांच्या सहकार्यामुळेच हे उपक्रम शक्य झाले. याबद्दल त्यांनी सर्व मित्रमंडळींचे मनापासून आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नेमळेकर यांनी केले.













