शोर मच गया शोरss फोंडा नगरी रेssss.गोकुळअष्टमी व गोपाळकाल्याचा फोंडाघाट मध्ये जल्लोष !

पावसाची रिमझिम – रंगावली — दहीहंडीची बाल गोपाळांमध्ये रस्सीखेच!

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी— गेले पाच दिवस उदंड उत्साहात पार पडलेल्या श्री देव राधाकृष्ण मंदिर फोंडाघाट मधील कृष्णजन्माच्या सोहळ्याची सांगता आज आज गोपाळकाल्याने मोठ्या उत्साहात करण्यात आली. पावसाची रिमझिम आणि विविध रंगांच्या बरसातीमध्ये, सकाळपासूनच बालगोपाळ रंगले होते. रंगीबेरंगी रंगांच्या उधळणीने बाजारपेठ न्हाऊन निघाली. ठीक अकरा वाजता घरोघरीच्या मांडा मध्ये विराजमान,गोपाळकृष्ण यजमानांच्या डोक्यावरून मिरवणुकीने आणि ” गोपालकृष्णss राधाकृष्णsss” च्या जयघोषात परतीच्या प्रवासास निघाले.सोबत कर्णमधुर मृदंग- टाळा यावर भजने म्हटली जात होती. शोर मच गया शोर अन ढाकूमss मागूमsss च्या गाण्यावर वाटेत राधाकृष्ण मंदिर आणि उंचावर बांधलेल्या कित्येक दहीहंडी, पेठेतील बालगोपाळांनी विविध खेळ खेळत राधाकृष्णाच्या जय जयकारात लीलया फोडल्या. त्यावेळी एकमेकांवरील रंगाची, रंगीत पाण्याची,पाणी भरलेल्या फुग्यांची उधळण अधिकच ऊर्जा देत होती. गाऱ्हाणे होऊन मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. आणि तीर्थप्रसादासाठी एकच झुंबड उडाली ….

 

 

पाच दिवस आधी राधाकृष्ण मंदिर आकर्षक झुंबर – रोषणाई ने आणि प्रवेशद्वार स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगी फुग्यांच्या कमानीने सजले होते. सकाळी अभिषेक व पूजा, नंतर श्रीगणेश व राधाकृष्णाची मूर्ती अलंकार पोशाखाने मुग्ध करीत होती. सायंकाळी पांडवप्रताप या ग्रंथाचे वाचन श्रावण महिन्यात सुरू होते.ॲड.विनोद गोखले यांचे रामदास चरित्रावर आधारित सायंकाळी किर्तन त्यानंतर बाबा पाटकर व वारकरी संप्रदायाकडून हरिपाठ व रात्री स्थानिक भजने ! एका रात्री पंचक्रोशीतील स्थानिक दशावतारी कलाकारांचे “भुताची सावली” हे भन्नाट नाटक रसिकांना भावले. तर संस्कृती कला मंच फोंडाघाट ग्रुपने फुगडी नृत्य सादर करून रसिकांचे लक्ष वेधून घेतले ….

 

 

 

तबलावादक मारुती मेस्त्री यांचे सुश्राव्य भजनाला भाविकांनी दाद दिली. जन्माष्टमीच्या दिवशी दहा वाजता विनोद गोखले यांच्या कृष्णजन्माचे कीर्तन खूपच रंगले. बारा वाजता कृष्णजन्मोत्सव फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आणि गोपाळ कृष्णाच्या जयघोषात संपन्न झाला. प्रतीकात्मक बाल कृष्णाला न्हाऊ हा माखू घातल्यानंतर विद्या म्हसकर व सहलींनी पाळणा म्हणून गोजवले.पालखी प्रदक्षिणेनंतर प्रसाद वाटप होऊन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी उपस्थित राहून आनंद लुटला…..