खेड (प्रतिनिधी) : भारतीय नौदलातील कमांडोंच्या विशेष पथकाने मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल (सी.बी.एस.ई.)ला भेट देत विद्यार्थ्यांना शौर्य, धैर्य, शिस्त आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली. कमांडोंच्या या विशेष भेटीमुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील यांची विशेष उपस्थिती होती. खेड पोलीस उपनिरीक्षक समेल सुर्वे यांच्या सहकार्याने भारतीय नौदलातील कमांडो श्री. विश्वनाथ देशपांडे हे आपल्या पथकासह ज्ञानदीप स्कूलमध्ये उपस्थित राहिले.
यावेळी नौदलाच्या कमांडोंनी विद्यार्थ्यांसमोर विविध साहसी आणि कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिके सादर केली. कमांडोंची शारीरिक क्षमता, चपळता, प्रसंगावधान, शिस्त तसेच आव्हानात्मक परिस्थितीत कार्य करण्याची त्यांची क्षमता पाहून विद्यार्थी भारावून गेले. प्रात्यक्षिकांदरम्यान कमांडोंनी आपल्या प्रशिक्षणातील विविध पैलूंची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
भारतीय नौदलाचे कार्य, देशाच्या सुरक्षेतील नौदलाची भूमिका, कमांडोंचे कठोर प्रशिक्षण, शिस्त, संघभावना आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही कमांडोंशी उत्स्फूर्त संवाद साधत विविध प्रश्न विचारले. त्यांच्या प्रश्नांना कमांडोंनी माहितीपूर्ण उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेचे समाधान केले.
नौदलाच्या जवानांचे धैर्य, समर्पण आणि देशसेवेची भावना विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. प्रत्यक्ष कमांडोंची कार्यपद्धती आणि साहसी प्रात्यक्षिके पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सशस्त्र दलांविषयी कुतूहल आणि आदराची भावना अधिक दृढ झाली. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना ‘देश प्रथम’ या भावनेसोबतच शिस्त, मेहनत, धैर्य आणि जबाबदारीचे महत्त्वही समजले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री. भरत मोरे, ज्ञानदीप कॉलेजचे प्राचार्य डॉ. उमेश कुमार बागल, संस्थेचे रजिस्टर श्री. जामकर तसेच सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. भारतीय नौदलाच्या कमांडोंनी शाळेला दिलेल्या या प्रेरणादायी आणि अविस्मरणीय भेटीबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.













