‘दशावतार : एक समृद्ध लोककला’ला श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार

प्रा. वैभव खानोलकर यांच्या साहित्यकृतीचा सन्मान

ठाणे : महाराष्ट्रातील साहित्यविश्वात प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ‘श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२५’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. साहित्यातील विविध साहित्यप्रकारांतील उल्लेखनीय साहित्यकृतींना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, प्रा. वैभव खानोलकर लिखित ‘दशावतार : एक समृद्ध लोककला’ या पुस्तकांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्र सारस्वत रा. वि. भावे यांनी १८९३ मध्ये स्थापन केलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या वतीने साहित्य क्षेत्रातील विविध प्रकारांतील गुणवत्तापूर्ण साहित्यकृतींचा गौरव केला जातो. यंदाच्या पुरस्कारांमध्ये कोकणच्या समृद्ध लोकपरंपरेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘दशावतार : एक समृद्ध लोककला’ या पुस्तकाला सन्मानित करण्यात येत असल्याने दशावतार या लोककलेच्या अभ्यासाला आणि दस्तऐवजीकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रा. वैभव खानोलकर यांनी या ग्रंथातून दशावतार लोककलेची परंपरा, इतिहास, रंगभूमी, कलावंत, सादरीकरणाची वैशिष्ट्ये तसेच कोकणच्या लोकजीवनाशी असलेले तिचे अतूट नाते यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. दशावतार ही केवळ मनोरंजनाची कला नसून कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा आणि लोकजीवनाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे, ही भूमिका या साहित्यकृतीतून अधोरेखित होते.

‘दशावतार : एक समृद्ध लोककला’ या पुस्तकाला मिळालेला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार हा प्रा. वैभव खानोलकर यांच्या साहित्यिक योगदानासोबतच कोकणच्या लोककलेचा आणि दशावतार रंगभूमीचा गौरव मानला जात आहे.

या पुरस्काराचे वितरण रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

प्रा. वैभव खानोलकर यांच्या या साहित्यिक यशाबद्दल साहित्य, शिक्षण आणि लोककला क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
प्रा.खानोलकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खानोली गावचे सुपुत्र ते सध्या रत्नागिरी जिल्हयात मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक म्हणून कार्यरत आहे.
त्याच्या या साहित्यीक यशाबद्दल मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल उर्फ बंधु मयेकर, आणि इतर सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक मोरे सर आणि सहाकारी शिक्षण व शिक्षककेतर कर्मचारी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.