मालवण नगरपरिषदेच्या वतीने कार्यवाही : नागरिकांची सुरक्षितता आणि मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मोकाट श्वानांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मालवण नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ पासून मोकाट श्वान पकडणे व निर्बिजीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर आणि मुख्याधिकारी श्री. प्रतीक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
शहरातील मोकाट श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे आणि श्वानांच्या वाढत्या संख्येचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी नगरपरिषदेमार्फत आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन, नागपूर या संस्थेची वार्षिक निविदा प्रक्रियेद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित संस्थेच्या माध्यमातून शहरातील मोकाट श्वानांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मोकाट श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपरिषदेमार्फत नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
*नागरिकांनी सहकार्य करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन*
मोकाट श्वान पकडणे व निर्बिजीकरणाची मोहीम सुरळीतपणे पार पडण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करावे. मोहिमेदरम्यान श्वान पकडण्याच्या तसेच निर्बिजीकरणाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
या मोहिमेमुळे शहरातील मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असून, नागरिकांची सुरक्षितता आणि श्वानांचे व्यवस्थापन या दोन्ही बाबींना महत्त्व देऊन नगरपरिषदेमार्फत ही कार्यवाही करण्यात येत आहे. अशी माहिती मालवण नगरपरिषदच्या वतीने देण्यात आली आहे.













