लांजा तालुका क्रीडा स्पर्धेत भांबेड विद्यालयाचे यश

विविध क्रीडा प्रकारांत विद्यार्थ्यांची पदकांची लयलूट
विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा, विद्यार्थ्यांवर होतोय अभिनंदनचा वर्षाव

संतोष कोत्रे
लांजा -: नुकत्याच पार पडलेल्या लांजा तालुका शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था, भांबेड संचलित प्रतापराव माने विद्यालय आणि सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात पदकांची लयलूट करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भांबेड विद्यालयाच्या विविध वयोगटांतील खेळाडूंनी धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, चालण्याची स्पर्धा आणि रिले अशा विविध क्रीडा प्रकारांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत आपल्या क्रीडानैपुण्याची चमक दाखवली. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्या दिनेश गावडे हिने गोळाफेक व थाळीफेक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवून विशेष यश संपादन केले. प्रांजल विश्वनाथ रसाळ हिने ८० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम, तर उंच उडीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. गौरी महेश गावडे हिने १०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या दोन्ही स्पर्धांत द्वितीय क्रमांक मिळवला. प्रांजल, गौरी, आर्या, गायत्री व आराध्या यांच्या रिले संघाने द्वितीय क्रमांक मिळवत सांघिक यशात भर घातली.
त्याचप्रमाणे १७ वर्षांखालील गटात तन्वी चंद्रकांत बावदाने हिने उंच उडी, १०० मीटर अडथळा शर्यत आणि लांब उडी या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. साक्षी राजेश मोहिते हिने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. वेदांत दिनेश गावडे याने ४×१०० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम, तर ८०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवला. सोहम जयवंत पांचाळ याने ५००० मीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रथम, तर मुस्तकीम आरिफ शेख याने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. सिद्धार्थ प्रदीप खामकर याने ४०० मीटर धावण्यात द्वितीय, ओमकार प्रशांत ब्रीद याने थाळीफेकमध्ये तृतीय, कृतिका संजय लांबोर हिने भालाफेकमध्ये द्वितीय, अवनी उदय गुरव हिने थाळीफेकमध्ये तृतीय, तर जानवी उमेश चौगुले हिने १५०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवला.
१९ वर्षांखालील गटातही विद्यार्थ्यांनी विजयाची परंपरा कायम राखली. शुभम दीपक पालेकर याने ३००० मीटर व १५०० मीटर धावण्याच्या दोन्ही स्पर्धांत प्रथम क्रमांक मिळवला. वैभव दत्ताराम शेळके याने १०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक पटकावला. सेजल रवींद्र दैत हिने ४०० मीटर धावण्यात द्वितीय, तर २०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवला. दीक्षा गणेश इंदुलकर हिने ४०० मीटर धावण्यात तृतीय, गौरवी सुनील मौसमकर हिने ३००० मीटर धावण्यात तृतीय, तर प्रणाली प्रदीप खामकर हिने १०० मीटर धावण्यात तृतीय आणि गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला.

सांघिक स्पर्धांमध्येही विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली. १७ वर्षांखालील मुलांचा रिले संघ आणि मुलींचा रिले संघ यांनी द्वितीय क्रमांक, तर १९ वर्षांखालील मुलींच्या रिले संघाने तृतीय क्रमांक पटकावला. त्यासाठी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक पी. एन. कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या या दमदार कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक पी. एन. कांबळे यांचे भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश साळुंके, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.