मसुरे विठ्ठल मंदिरात हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता!

▪️भजनाचा गजर, नेत्रदीपक दिंड्या आणि देखाव्यांनी भाविक मंत्रमुग्ध

मसुरे | झुंजार पेडणेकर

‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला’ च्या अखंड नामघोषात, टाळ-मृदंगाचा भक्तिमय गजर, आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मसुरे-मर्डेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताहाची अत्यंत भक्तीभावाने आणि अलोट उत्साहात सांगता झाली. गेले आठ दिवस अखंड चाललेल्या या नामयज्ञाने संपूर्ण मसुरे नगरीसह आजूबाजूचा परिसर भक्तीच्या रसात न्हाऊन निघाला होता.

सप्ताहाच्या निमित्ताने दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्थानिक भजनी मंडळांसोबतच त्रिंबक, चिंदर, मालोड, पोयरे, मोर्वे, बेलाचिवाडी, बांदिवडे आणि आडवली येथील नामवंत भजनी मेळ्यांनी श्रींच्या चरणी आपली सुरेल भजने रुजू करून वातावरण अधिकच चैतन्यमय केले. मसुरे टोकळवाडी मंडळाच्या पारंपरिक ‘गोफ नृत्याने’ तर उपस्थितांची मने जिंकून कार्यक्रमात विशेष रंगत आणली.

सप्ताहाच्या अंतिम दोन दिवसांत काढण्यात आलेल्या दिंड्या हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरल्या. या दिंड्यांमध्ये स्थानिक मंडळांनी उभारलेले जिवंत व कलात्मक देखावे भाविकांच्या विशेष पसंतीस उतरले.

मसुरे टोकळवाडी मंडळाने विघ्नहर्त्या गणरायाचा गौरव करणारा ‘मूषक वाहन’ देखावा. मसुरे मर्डेवाडी मंडळाने शिव-शक्तीच्या अद्भूत रूपाचे दर्शन घडवणारा ‘अर्धनारी नटेश्वर’ देखावा,

मसुरे गडघेरावाडी मंडळाने मातृ-पितृ भक्तीचा आदर्श आणि श्री विठ्ठलाच्या आगमनाची कथा सांगणारा ‘भक्त पुंडलिक आणि विठ्ठल’ देखावा सादर केला.

हे देखावे पाहण्यासाठी आणि श्रींच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

सप्ताहाच्या सांगता प्रसंगी भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी झालेली गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर आणि भव्य फटाक्यांची आतषबाजी यामुळे मर्डेवाडी परिसर दुमदुमून गेला होता. भक्तांच्या चेहऱ्यावरील भक्तीचा आनंद आणि हरिनामाचा जयघोष यामुळे वातावरण पूर्णपणे विठ्ठलमय झाले होते.

हा भव्य सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, सदस्य, स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व भक्तांच्या सहकार्यामुळे हरिनाम सप्ताह अत्यंत अभूतपूर्व आणि स्मरणीय ठरला.