सासरच्या मंडळींकडून मानसिक, शारीरिक छळ, विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

crime
पतीसह चौघांवर गुन्हा दाखल, कुवे वारीशेवाडी येथील घटना

लांजा (प्रतिनिधी): पतीसह सासरच्या मंडळीच्या सततच्या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून कुवे येथे राहत्या घरी गळफास लावलेल्या २७ वर्षीय विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह, सासू, सासरे आणि दीर अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या
सुमारास घडली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत्यू झालेल्या सौ. शुभ्रा ऋषीकेश यादव (वय २७) हिचा दि. १७/२/२०२६ रोजी ऋषीकेश प्रकाश यादव (वय २७, राहणार कुवे वारीशेवाडी) याच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून शुभ्रा हीचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता. घराचे कर्ज फेडण्याकरिता शुभ्रा
हिला माहेरकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. शारीरिक मानसिक छळ केला जात होता.
अखेर पतीसह सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून शुभ्रा यादव हिने ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कुवे वारीशेवाडी येथील राहत्या घरी बेडरूम मध्ये साडीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालय त्यानंतर रत्नागिरी येथे हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा ७ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता.
याबाबत ची फिर्याद शुभ्रा हीची बहीण
तृप्ती भालचंद्र माजलकर ( वय ३२, राहणार लांजा गोंडे सखल रोड) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी शुभ्रा तिचा पती ऋषीकेश यादव, सासरा प्रकाश केशव यादव (वय ६७), सासू सुवर्णा प्रकाश यादव (वय ५५), दीर अनमोल प्रकाश यादव (वय २५) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ८५, १०८, ३(५), प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे हे करीत आहेत.