वेंगुर्ला तालुकास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
परुळे : प्रतिनिधी
विद्यार्थी वर्गाच्या वैज्ञानिक कलागुणांना वाव देण्यासाठी बाल वैज्ञानिक प्रदर्शन सारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षणाला विद्वाना ची जोड दिल्यास नवे संशोधन उभे राहते. आपल्या देशात अनेक वैज्ञानिक होऊन गेले त्यांनी वेगवेगळे विज्ञानाचे प्रयोग समाजासमोर ठेवले आहेत. आजच्या विद्यार्थ्यांनीही त्या विज्ञानाचा अभ्यास करून वैज्ञानिक बनावे. वेंगुर्ला तालुकास्तरीय बालविज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले सुंदर असे वैज्ञानिक मॉडेल पाहता पुढे या विद्यार्थ्यांमधून एक तरी वैज्ञानिक घडेल असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी परुळे येथे बोलताना व्यक्त केला.
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, निरीक्षण क्षमता आणि संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ वे वेंगुर्ला तालुकास्तरीय दोन दिवसीय बालवैज्ञानिक प्रदर्शन सन २०२६-२७ हे शुक्रवार २७ व शनिवार २८ नोव्हेंबर रोजी अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी दुपारी वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, पं.स. सदस्य नितीन मांजरेकर, सदस्या शीतल राऊत, गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, केंद्र प्रमुख उमेश वजराठकर, विज्ञान मंडळ सदस्य तृप्ती देसाई, प्रशालेचे संस्था अध्यक्ष अविनाश देसाई, उपाध्यक्ष डॉ.उमाकांत सामंत, भोगवे ग्रामपंचायत माजी सरपंच महेश सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा तसेच प्राथमिक गटातील प्रश्नमंजुषा व प्रतीकृती मांडणी स्पर्धा आयोजन करण्यात आले होते .त्यानंतर दुपारी २ वाजता उद्घाटन सोहळा संपन्न झाला.शनिवार २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता प्राथमिक व माध्यमिक गटातील प्रतीकृती परीक्षण, सकाळी १०.३० वाजता माध्यमिक गटातील प्रश्नमंजुषा स्पर्धा, तर दुपारी ३ वाजता पारितोषिक वितरण व समारोप समारंभ होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना सभापती शंकर घारे म्हणाले की, परुळे हायस्कूल ने सुंदर असे आयोजन या बाल विज्ञान प्रदर्शनाचे केले आहे. मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आजच्या या विज्ञान प्रदर्शनात मांडलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रयोगावरून दिसून आला. विद्यार्थ्यांचे कौतुक करून सभापती घारे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर उपसभापती सचिन देसाई म्हणाले की मुलांना आपले कलागुण दाखवण्यासाटी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बाल वैद्यनिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. माझ्या मतदारसंघात हा कार्यक्रम होत आहे याचा अभिमान आहे. मुलांनी असेच वैज्ञानिक प्रयोग करून आपले नावलौकिक मिळवावे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभु पंचलिंग यांनी तर तसेच आभार मुख्याध्यापक सचिन माने यांनी मानले.












