मडूरा माऊली मंदिरात नवरात्रौत्सवात भरगच्च कार्यक्रम

बांदा (प्रतिनिधी) :

मडूरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त ११ ते १९ ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त दररोज दुपारी १ वा. आरती व महाप्रसाद तसेच सायं. ६ वा. भजन व आरती होईल.

रविवार ११ रोजी सकाळी देवींची पूजाअर्चा, घटस्थापना, सायं. ६ वा. पासून परबवाडी, देऊळवाडी व रेडकरवाडी मंडळाची भजने, रात्री ९ वा. एम जी व्ही ग्रुप आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय दांडिया स्पर्धेला सुरुवात होईल. सोमवार १२ रोजी रात्री ८ वा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन व गावातील उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होईल. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जि. प. सदस्य सुदन कवठणकर व माजी सरपंच सुरेश परब उपस्थित राहतील. रात्री ९ वा. राज्यस्तरीय दांडिया स्पर्धा होईल.

मंगळवार १३ रोजी रात्री ८ वा. हळदीकुंकू, ९ वा. ‘आमचं असं तुमचं कसं’ हे विनोदी नाटक होईल. बुधवार १४ रोजी सायं. ७ वा. श्री समर्थ राष्ट्रोळी महालक्ष्मी आरती मंडळ शिरसई गोवा यांची घुमट आरती, ९ वा. पार्सेकर दशावतार मंडळाचे नाटक होईल.

गुरुवार १५ रोजी सायं. ५ वा. रेडकरवाडी महिला मंडळाची फुगडी, ७ वा. श्री सातेरी महिला कला संघ कासारवर्णे गोवा यांचे समई नृत्य, ८ वा. ह. भ. प. नेहा उपाध्ये यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. त्यांना विद्याधर नाईक ऑर्गन तर सूरज मोरजकर तबला साथसंगत करतील. १० वा. दांडिया नृत्य होईल. शुक्रवार १६ रोजी रात्री ९ वा. रुपेद्र परब यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल.

शनिवार १७ रोजी रात्री ९ वा. नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होईल. रविवार १८ रोजी रात्री ८ वा. ‘खेळ रंगला नारी शक्तीचा’ हा महिलांसाठी स्पर्धात्मक कार्यक्रम होईल. सोमवार १९ रोजी संध्या. ६.३० वा. दीपोत्सव व महाआरती, ७.३० वा. नऊवारी साडी दिनानिमित्त पैठणी सोडत, रात्री ९ वा. ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम होईल. विजेत्यांना १० हजार, ५ हजार व ३ हजार रुपये किमतीच्या पैठणी पुरस्कृत आहेत. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवरात्रौत्सव मंडळ अध्यक्ष सिद्धेश परब यांनी केले आहे.