सावंतवाडी:
सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील रजिस्टर गहाळ तसेच अपहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी भारत लाखे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दोडामार्ग येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. कुलकर्णी यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करण्याचा निर्णय दिला.
सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने आरोपी भारत लाखे याची सखोल चौकशी करण्यासाठी आणि गहाळ झालेले पाणीपुरवठा रजिस्टर जप्त करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली होती.
मात्र, आरोपीच्या वकिलांनी सरकार पक्षाचा दावा फेटाळून लावत न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. आरोपीने पाणीपुरवठा विभागातील कोणतेही रजिस्टर गहाळ केलेले नाही. घटनास्थळाच्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये आरोपी केवळ स्वतःचा रेनकोट आणि कामाच्या हत्यारांची पिशवी घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे. तसेच घटनेनंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्याने तपासकामात पोलिसांना पूर्ण सहकार्य केले आहे, असा दावा बचाव पक्षाने केला.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेतल्यानंतर न्यायदंडाधिकारी एस. ए. कुलकर्णी यांनी आरोपी भारत लाखे याला जामीन मंजूर केला. या प्रकरणी आरोपीच्या वतीने ॲड. संग्राम देसाई, ॲड. चैतन्य सावंत, ॲड. सौरव देसाई, ॲड. राहुल पै, ॲड. ऐश्वर्या पिंगुळकर आणि ॲड. राहुल जाधव यांनी न्यायालयात बाजू मांडली.












