आचरा-अर्जुन बापर्डेकर
कोकण मराठी साहित्य परिषदेचे 2024-25 चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेच्या आजीव सदस्या आणि लेखिका उज्ज्वला चंद्रशेखर धानजी यांना त्यांच्या
” वलयांकित चंद्र ” या पुस्तकासाठी संपादनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
उज्ज्वला धानजी यांच्या विघ्नेश प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ” वलयांकित चंद्र ” या संपादित पुस्तकाला हा पुरस्कार लाभला असून त्यांचे पती चंद्रशेखर मनोहर धानजी यांच्या सेवानिवृत्तीदिनी त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारे हे संपादित पुस्तक आहे.
श्री.चंद्रशेखर धानजी हे भारतीय स्टेट बँक कलमठ या शाखेतून 39 वर्ष सेवा करून चीफ असोसिएटस या पदावरून 30 एप्रिल 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. आपल्या पतीच्या बँकिंग, सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक क्षेत्रातील कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या त्यांच्या स्नेह्यांचे लेख संकलित करून त्यांच्या सेवानिवृत्तीदिनी हे पुस्तक उज्ज्वला धानजी यांनी संपादित केलेले आहे.
या पुस्तकामध्ये मधुसूदन नानिवडेकर, सुरेश ठाकूर, प्रसाद घाणेकर, दीनानाथ धानजी, नंदकिशोर नाटेकर, एकनाथ वायंगणकर, ज्ञानेश्वर मांजरेकर,गुरुनाथ पावसकर, संतोष रानडे, प्रभाकर वळंजू, विवेक कार्लेकर, वैष्णवी धानजी,अनिल कांबळी, हरी पेडणेकर, मकरंद कुलकर्णी, राजन ठाकूर आदी अनेक जणांचे लेख असून या पुस्तकाला श्री.माधव गावकर यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
उज्ज्वला चंद्रशेखर धानजी या बँक ऑफ महाराष्ट्र कणकवली शाखेतून मुख्य रोखपाल या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्या ललित लेखिका असून त्यांचे लेखन सातत्यपूर्ण विविध मासिके आणि नियतकालिकांमधून प्रकाशित होत असते.
अलीकडेच त्यांचे ” आठवणींच्या हिंदोळ्यावर ” हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे.
त्यांच्या पुरस्काराबद्दल सुरेश शामराव ठाकूर अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण, रुजारिओ पिंटो केंद्रीय सदस्य कोकण मराठी साहित्य परिषद आदी अनेकांनी त्यांचे कौतुक केलेले आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळा कवितेच्या राजधानीत मालगुंड रत्नागिरी येथे कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत 27 नोव्हेंबर 2026 ला होणार असून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.













