चिवला बीच येथील रस्ता दुरुस्ती कामाची बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्याकडून पाहणी
कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार येता नये : बांधकाम सभापतींच्या सक्त सूचना
मालवण | प्रतिनिधी : पर्यटक आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या चिवला बीच येथील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सुमारे ५० लाख रुपयांच्या निधीतून या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. या कामाची पाहणी शुक्रवारी मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर आणि आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी केली.
यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून संबंधित ठेकेदार आणि यंत्रणेला कामाचा दर्जा चांगला राखण्याच्या तसेच काम योग्य पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सार्वजनिक निधीतून होणारी विकासकामे दर्जेदार आणि टिकाऊ झाली पाहिजेत. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार येऊ नये, याची दक्षता घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मालवण शहराच्या विकासाच्या दृष्टीने विविध कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. चिवला बीच हे पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असून, येथे स्थानिक नागरिकांसह मोठ्या संख्येने पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे या परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि काँक्रिटीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. सुमारे ५० लाख रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या या कामामुळे रस्त्यांची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
या विकासकामाचा नागरिक आणि पर्यटकांना लाभ मिळावा, यासाठी काम नियोजनबद्ध पद्धतीने आणि दर्जेदार साहित्याचा वापर करून पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सहदेव बापर्डेकर आणि पूनम चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवून ते योग्य प्रकारे पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.













