चार विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड; जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
स्वप्निल कदम -कुडाळ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत आयोजित शालेय जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वेताळ बांबर्डे नाग्या महादू निवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत चार विद्यार्थ्यांनी यश मिळवत विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
८ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील वेताळ बांबर्डे नाग्या महादू निवासी वसतिगृहात ही स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या गटात उजा पवार हिने प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात सागर प्रकाश निकम याने द्वितीय, तर रोहित चंदू निकम याने तृतीय क्रमांक मिळवला. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात वनिता चंदू निकम हिने प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या यशात भर घातली.
या चारही खेळाडूंची विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना उदय आईर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आप्पा गावडे, सचिव नागेंद्र परब, मुख्याध्यापक मिलिंद कर्पे आणि पर्यवेक्षिका सौ. दाभोलकर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.













