रत्नागिरी :
मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि साहित्य चळवळ सातत्याने वृद्धिंगत करणाऱ्या ‘कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे’ (कोमसाप) सन २०२४-२५ या वर्षाचे मानाचे साहित्यिक व साहित्येतर पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. कोकण आणि महाराष्ट्रभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांच्या योगदानाची दखल समाजापर्यंत पोहोचवणे आणि नव्या पिढीला प्रेरणा देणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी कळवले आहे.
या पुरस्कारांची यादी अत्यंत विस्तृत असून, यामध्ये विविध वाङ्मयीन प्रकारांतील दर्जेदार पुस्तकांना आणि साहित्यसेवकांना गौरविण्यात येणार आहे.
वाङ्मयीन पुरस्कारांचे मानकरी:
र.वा. दिघे स्मृती पुरस्कार (कादंबरी): विवेक गोविलकर यांच्या ‘सिंफनी’ (प्रथम) आणि उदय जोशी यांच्या ‘संघर्षपर्व’ (द्वितीय) या कादंबऱ्यांना जाहीर झाला आहे.
वि.वा. हडप स्मृती पुरस्कार (कथासंग्रह): स्टिफन परेरा यांच्या ‘काळवेळ’ (प्रथम) आणि अशोक लोटणकर यांच्या ‘निराधार’ (द्वितीय) या कथासंग्रहांना मिळाला आहे.
आरती प्रभू स्मृती पुरस्कार (कविता): डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या ‘उडवाच मान माझी’ (प्रथम) आणि विलास गावडे यांच्या ‘व्यक्त होतोय मी’ (द्वितीय) या काव्यसंग्रहांना जाहीर झाला आहे.
इतर प्रमुख पुरस्कार:
आत्मचरित्र (प्रथम): आनंद इंदिरा यांचे ‘क्षण सोनेरी – रुपेरी आणि काटेरी’ (धनंजय कीर स्मृती पुरस्कार).
चरित्र (प्रथम): श्रीधर सांडू यांचे ‘भरती – ओहोटी’ (श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार).
समीक्षा (प्रथम): श्यामसुंदर गायकर व डॉ. शिल्पा जोशी यांचे ‘मंगेश पाडगावकरांचे गीत – काव्य’ (प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार).
नाटक (प्रथम): अरुण मोर्ये यांचे ‘कृष्णा माझं काय चुकलं’ (भाई भगत पुरस्कार).
ललित गद्य (प्रथम): वर्षा कवळेकर यांचे ‘सफर खुबसुरत है मंजिलसे’ (अनंत काणेकर स्मृती पुरस्कार) आणि द्वितीय: नितीन तेंडुलकर यांचे ‘अधिक उंच उडता उडता’.
बालवाङ्मय: डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांचे ‘सशा रे सशा’.
संकीर्ण: डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांचे ‘कातळशिल्पांच्या पाऊलखुणा’ (प्रथम) आणि रविराज गंधे यांचे ‘महासागर’ (द्वितीय).
वैचारिक: रेखा कोरे यांचे ‘महात्मा बसवेश्वर कृतीतून प्रगतीकडे’.
विशेष पुरस्कारांमध्ये उज्ज्वला चं. धानजी, प्रकाश पाटील, मेघना साने, प्रज्ञा जांभेकर आणि डॉ. जिवबा कळूसकर यांच्या कृतींचा गौरव करण्यात आला आहे.
साहित्येतर व कार्यकर्ता पुरस्कार:
कविता राजधानी पुरस्कार: ठाण्याचे प्रख्यात कवी व गीतकार प्रविण अनंत दवणे यांना जाहीर झाला आहे.
कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार: मुंबईचे अशोक नर यांना प्रदान केला जाणार आहे.
श्री. बा. कारखानीस पुरस्कार: मालगुंड, रत्नागिरीचे श्री. सुनिल मुरारी तथा बंधू मयेकर यांना जाहीर झाला आहे.
कोमसाप कार्यकर्ता व शाखा पुरस्कार: सिंधुदुर्गचे मंगेश मस्के, ठाण्याचे तुकाराम कांदळकर आणि प्रविण सोनावणे यांना विविध कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाले आहेत. तसेच उत्कृष्ट शाखा म्हणून चेंबूर (मुंबई) आणि मुरुड जंजिरा (रायगड) शाखांना सन्मानित केले जाणार आहे.
विशेष महिला व युवा पुरस्कार: सौ. शुभदा मुळ्ये (मालगुंड), सौ. पुष्पा कोल्हे (मुंबई), सौ. स्नेहा फणसळकर (सिंधुदुर्ग), सौ. संध्या दिवकर (रोहा), महाविद्यालयीन विद्यार्थिनी कु. संस्कृती तांडेल आणि कवी अमेय धोपटकर यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
कोमसापच्या या पुरस्कार घोषणांमुळे संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रभरातील साहित्य वर्तुळातून विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हे पुरस्कार साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहेत.
Home महत्वाच्या बातम्या कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे सन २०२४-२५ चे साहित्यिक व साहित्येतर पुरस्कार जाहीर












