दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना सुरू

नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा
नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांचे नागरिकांना आवाहन
शहराचा अडीज कोटीचा टंचाईकृती आराखडा आ. किरण सामंत यांच्या माध्यमातुन शासनाकडे पाठविणार

राजापूर प्रतिनिधी : कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे शासनाने राजापूर तालुक्याच्या दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश केला आहे. त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती व उन्हाळी हंगामात निर्माण होणारी पाणीटंचाई याचा विचार करून उपलब्ध पाणीसाठयाचे सुयोग्य नियोजन करून शहरवासीयांना टंचाईच्या झळा बसणार नाहीत याची खबरदारी घेण्याचा व टंचाई निवारणार्थ प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. शहराचा सुमारे अडीज कोटीचा टंचाईकृती आराखडा तयार करण्यात आला असून आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातुन तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मात्र तीव्र पाणीटंचाईचे संकट लक्षात घेत नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, आपण सगळे मिळून सामूहिक प्रयत्नांनी या टंचाईच्या संकटावर मात करूया असे आवाहन नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांनी केले आहे.
दुष्काळी परिस्थिती व संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पत्रकार परिषदेत एड. खलिफे यांनी नगर परिषद करत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. कोंढेतड भागात पाणीपुरवठा वाहिनीला गळती लागल्याने या भागात तसेच शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. याची तात्काळ दखल घेत या ठिकाणची पाणीपुरवठा वाहिनी बदलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या भागासह शहरात सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला. कोदवली धरण व शिळ जॅकवेलकडे दोन मोठे तर अर्जुना व कोदवली नदीपात्रात असे १५ वनराई बंधारे बांधणे, शहरातील पाणीवितरणातील गळती रोखणे, सार्वजनिक व खासगी विहिरींची स्वच्छता करणे, शिळ जॅकवेलकडील रखडलेले स्वतंत्र विजवाहिनीचे काम पुर्ण करून घेणे, जनरेटर खरेदी करणे, टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करणे यासह टंचाई काळात ज्या काही प्रभावी उपाययोजना कराव्या लागतील त्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोदवली धरणात जास्तीत जास्त पाणीसाठा व्हावा यासाठी नवीन पर्यायी धरणाची झडपे बसविण्याचे काम ताडतीने करण्याबाबत ठेकेदाराला सुचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शहरात पाणीपुरवठा वाहिन्यांवर विद्युत पंप लावून होत असलेली पाणी चोरी गंभीर समस्या असून या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरवासीयांना टंचाईची झळ कमी कशी बसेल यासाठी आपले प्रयत्न सुरू असून आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातुन शासन स्तरावर राजापूर नगर परिषदेला जास्तीत जास्त टंचाईकृती आराखडयातील निधी कसा उपलब्ध होईल यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला बांधकाम सभापती सौरभ पवार उपस्थित होते.