तोरसोळे येथील श्री देवी भगवती देवालयाचा नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून

विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

(शिरगाव प्रतिनिधी) :
देवगड तालुक्यातील तोरसोळे येथील श्री देवी भगवती देवालयाचा नवरात्रोत्सव ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त घटस्थापना, भजन, महाआरती, महापूजा, महायज्ञ, महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दशावतार नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ होईल. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता श्री बाबा मेस्त्री संचलित खानोलकर दशावतार नाट्य मंडळ, खानोली यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.

मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी महिलांसाठी गरबा, फुगडी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी श्री सावरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळातर्फे ‘श्री क्षेत्र गाणगापूर’ हा दत्तभक्तीवर आधारित नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. दत्तनामाचे महत्त्व सांगणाऱ्या या नाट्यप्रयोगातून भक्तिरसासोबत विनोदाचीही मेजवानी अनुभवता येणार आहे.

गुरुवार, १५ आणि शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी महिलांचे गरबा, फुगडी, समईनृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी श्री देव हेळेकर दशावतार नाट्यमंडळ, कारिवडे (ता. सावंतवाडी) यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी श्री गणेश भवानी दशावतार नाट्य मंडळ, हुंबरट (ता. कणकवली) यांच्यातर्फे मालक अप्पा दळवी यांचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता देवीची महापूजा आणि १० वाजता महायज्ञ होणार आहे. तसेच रात्री महिलांचे गरबा, फुगडी, समईनृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

११ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत दररोज रात्री ८.३० वाजता भजन आणि रात्री ९.३० वाजता महाआरती होणार आहे.
मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी दसरोत्सवानिमित्त सीमोल्लंघनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाने श्री देवी भगवती देवालयाच्या नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

उत्सवाच्या कालावधीत भाविकांनी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बारा पाच मानकरी व ग्रामस्थ यांनी केले आहे.