जीवितहानी टळली!
खेड । प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ब्रेक फेल झाल्याने जांभा दगड वाहून नेणाऱ्या बारा चाकी ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
एमएच ०८ एपी २७३६ क्रमांकाचा भारत बेंच कंपनीचा हा ट्रक जांभा दगड घेऊन मुंबईच्या दिशेने जात होता. भोस्ते घाटातील ब्लाइंड स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवघड वळणाच्या उतारावर ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक महामार्गालगतच्या संरक्षक भिंतीवर आदळला. त्यानंतर ट्रक महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर जाऊन धडकला.

या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. भोस्ते घाटातील धोकादायक वळणांवर अवजड वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.












