चिपळूण-गुहागर महामार्गावर मिरजोळी येथे रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या फांद्या तात्काळ छाटण्याची मागणी

 अपघाताची शक्यता
चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण-गुहागर महामार्गावर मिरजोळी गावच्या हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात आल्याने वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संबंधित विभागाने तात्काळ झाडांच्या फांद्या छाटाव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामपंचायत सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या मुमताज दलवाई यांनी केली आहे.
मिरजोळी येथे नॅशनल इंग्लिश मिडियम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जिल्हा परिषद शाळा आणि दलवाई हायस्कूल अशी तीन शाळा आहेत. या तीनही ठिकाणी मार्गावर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच हा मुख्य मार्ग असल्याने गुहागर व इतर आतील गावांत जाणाऱ्या एस.टी. बस आणि मालवाहू गाड्यांची सतत ये-जा मोठ्या प्रमाणात असते. चिपळूण शहरात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. सध्या सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्याने आणि त्यातच झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने समोरचे काहीच दिसत नाही. यामुळे किरकोळ तसेच गंभीर अपघात घडत आहेत. “संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ झाडांच्या फांद्या छाटून रस्ता मोकळा करावा. जर वेळेत कार्यवाही झाली नाही आणि एखादा मोठा अपघात घडल्यास याला सर्वस्वी संबंधित विभाग जबाबदार असेल, असा इशाराही मुमताज दलवाई यांनी दिला आहे.