घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत चालणार लांजा येथे श्री दुर्गामाता दौडीचा जयघोष!
संतोष कोत्रे
लांजा : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, लांजा यांच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले असून दि. ११ ऑक्टोबर रोजी अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेली ही दौड २० ऑक्टोबर रोजी अश्विन शुद्ध दशमी अर्थात विजयादशमीपर्यंत सुरू राहणार आहे. यानिमित्ताने जय श्रीराम, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव च्या घोषणांनी लांजा शहर परिसर दणाणून सोडला जातो.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, लांजा यांच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जाते.या कालावधीत दररोज सकाळी पावणे सहा ते सव्वा सात या वेळेत श्री दुर्गामाता दौड काढण्यात येते. दररोज तीन ते चार वाड्यांमध्ये तसेच प्रत्येक वाडीतील तीन ते चार मंदिरांमध्ये धार्मिक पूजा-अर्चा करण्यात येते. त्यानंतर देवीचा जयघोष, प्रेरणादायी घोषणा आणि उत्साहपूर्ण वातावरणात दौड काढली जाते.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरेचे जतन व्हावे, समाजामध्ये धार्मिक जागृती निर्माण व्हावी तसेच तरुणांमध्ये धर्माभिमान, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
दरम्यान, विजयादशमीच्या दिवशी भव्य श्री दुर्गामाता महादौडीचे आयोजन करण्यात येणार आहे. या महादौडीत मोठ्या संख्येने धारकरी आणि हिंदुत्वप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, लांजा यांच्या वतीने करण्यात आले आहे.













