धनंजय चितळे यांनी उलगडला वंदे मातरम् गीताचा इतिहास आणि राष्ट्रभक्तीचा भावार्थ
चिपळूण (प्रतिनिधी) : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात आयोजित ‘नवरात्र भारतमातेचे’ या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात धनंजय चितळे यांनी ‘संपूर्ण वंदे मातरम्’ या विषयांतर्गत वंदे मातरम् गीताची निर्मिती, त्यामागील कवी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची संकल्पना, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्यलढ्यातील या गीताचे महत्त्व विविध संदर्भांसह उलगडले. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पाचा कार्यक्रम नियोजित वेळेनुसार सुरू झाला. धनंजय चितळे यांच्या अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या विवेचनाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
व्याख्यानासाठी श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती. दिवसेंदिवस या व्याख्यानमालेविषयी रसिकांमध्ये उत्सुकता वाढत असून, व्याख्यानमालेला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आज व्यक्त होताना यजुर्वेदातील दाखल्यांच्या आधारे आदर्श राष्ट्र कसे असावे याचे विवेचन चितळे सर यांनी केले. यासोबतच ‘गजानन विजय’ ग्रंथाच्या पंधराव्या अध्यायातील कथांचाही संदर्भ त्यांनी दिला. मातृभूमीला वंदन करणे म्हणजेच ‘वंदे मातरम्’ या शब्दांचा भावार्थ स्पष्ट करताना या गीताच्या जन्मामागील विचारविश्व त्यांनी श्रोत्यांसमोर मांडले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या प्रतिभेचा, त्यांच्या राष्ट्रविषयक चिंतनाचा आणि या गीतावरील त्यांच्या दृढ विश्वासाचा वेध घेताना धनंजय चितळे यांनी, हे गीत काही काळानंतर देशाचा आत्मस्वर ठरेल, असा विश्वास बंकिमचंद्रांना होता, हे अधोरेखित केले. अश्विन शुद्ध अष्टमीला बंकिमचंद्रांना दुर्गा मातेचे झालेले दर्शन आणि वंदे मातरम् गीताच्या जन्माचा संदर्भही त्यांनी विशद केला. रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या महान देशभक्ताने या गीताचे प्रथम जाहीर गायन केल्याचा ऐतिहासिक संदर्भ देतानाच, वंदे मातरम् या मंत्राने अनेकांना देशभक्तीच्या भावनेने प्रेरित केले, असे त्यांनी सांगितले.
कवी अरविंद यांनीही या गीताचे सविस्तर आणि भावपूर्ण विवेचन केल्याचा उल्लेख त्यांनी केला. व्याख्यानातील आत्मबलिदानाचा संदर्भ विशेष भावस्पर्शी ठरला. क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांच्या आत्मकथनातील विचारांचा दाखला देत धनंजय चितळे यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या भावनेचे महत्त्व स्पष्ट केले. भारतभूमीत पुन्हा जन्म मिळावा आणि तोही भारतमातेच्या सेवेसाठी असावा, अशी भावना व्यक्त करणाऱ्या या आत्मकथनाचा शेवट ‘वंदे मातरम्’ने होतो, हा संदर्भ त्यांनी प्रभावीपणे मांडला. ‘वंदे मातरम्’ आणि ‘जयोस्तुते’ या गीतांमधील साम्य अधोरेखित करताना त्यांनी वंदे मातरम् गीताला लाभलेले ऐतिहासिक महत्त्व आणि त्याला झालेला विरोध यांचाही आढावा घेतला. १९०५ मधील वाराणसी काँग्रेस अधिवेशनाच्या संदर्भाने या विरोधाची चर्चा करण्यात आली. वंदे मातरम् गीताला राष्ट्रगीताचा दर्जा मिळावा, अशी अनेकांची इच्छा असतानाही जातिभेदाच्या भिंतींमुळे या गीताच्या वाटचालीवर मर्यादा आल्या, अशी मांडणी त्यांनी केली. सांगीतिक क्षेत्रात वंदे मातरम् गीताला मानाचे स्थान मिळवून देण्याच्या संदर्भात कृष्णराव यांच्या योगदानाचाही उल्लेख करण्यात आला.
भारतीय परंपरेतील सगुण आणि निर्गुण उपासनेचा संदर्भ देताना, निर्गुण-निराकार परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी सगुणाचा आधार घेतला जातो, हा विचार त्यांनी स्पष्ट केला. वंदे मातरम् गीताच्या सुरुवातीला भारतमातेचे सगुण रूप वर्णन केल्यामुळे मातृभूमीविषयीची श्रद्धा आणि समर्पणाची भावना अधिक प्रभावीपणे व्यक्त होते, असे त्यांनी सांगितले. आजच्या व्याख्यानाची सांगता स्मिता करंदीकर यांनी सादर केलेल्या सुरेल संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीताने झाली.













