स्वराज्य रवी ‘ हे नाटककार ला.कृ.आयरे यांचे नाटक नव्या स्वरूपात रंगभूमीवर येणार

लांजा (प्रतिनिधी) : तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र आणि कामगार रंगभूमीवरील प्रथितयश नाटककार ला.कृ. आयरे यांचे स्वराज्य रवी हे नाटक लवकरच नव्या स्वरूपात रंगभूमीवर येणार असल्याची माहिती
नाटककार ला.कृ.आयरे स्मृती ट्रस्ट चे सरचिटणीस सुभाष लाड यांनी दिली.
लेखक, दिग्दर्शक,अभिनेता आणि आणि निर्माता अशा सर्व भुमिकेतून काम करणाऱ्या नाटककार ला.कृ.आयरे यांना एवढी मोठी प्रसिद्धी मिळाली कि त्यांच्या नाट्य पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या काढाव्या लागल्या.कोकण, पश्चिम महाराष्ट्र,गोवा आणि नागपूर कडच्या भागातील गावोगावच्या नाट्यसंस्था त्यांच्या नाटकांचे प्रयोग करीत असत.
त्यांची नाटकाची २३ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांचे सर्वच विषय सामाजिक प्रश्नांवरती वाचा पण नावे आहेत. मात्र एकमेव ऐतिहासिक नाटक लिहिले गेले ते म्हणजे ‘ स्वराज्य रवी.’ नाटक संस्कृतीचा इतिहास पाहता सुरुवातीच्या काळातील नाटके रात्री लवकर सुरू झालेली नाटके सकाळी उजाडेपर्यत चालत.त्याकाळी पांच अंकी नाटक म्हणजे पाच ते सहा तास हा खेळ चाले.मात्र पुढे बदल होऊन तीन अंकी संहिता लिहिल्या जाऊ लागल्या.स्त्रीपात्रे सुद्धा तीन चार अशा संख्येत असत.तो ही आता मागे पडला आणि प्रेक्षक दोन अडीच तासापेक्षा जास्त वेळ बसत नाहीत हे लक्षात घेऊन दोन अंकी नाटकांची परंपरा रुढ झाली आहे.
नाटककार ला.कृ.आयरे यांच्या स्वराज्य रवी हे नाटक तीन अंकी असल्याने त्याचे प्रयोग होत नव्हते.म्हणून नाटककार ला.कृ.आयरे स्मृती ट्रस्ट चे सरचिटणीस सुभाष लाड यांनी मुंबईतील महालक्ष्मी कला मंच कडे हे नाटक दोन अंकी स्वरूपात रंगमंचावर आणण्याची विनंती केली. महालक्ष्मी कला मंच की कोकणातल्या तरुण कलाकारांनी ऐतिहासिक नाटकांसाठी निर्माण केलेली संस्था असून गेल्या सात वर्षात वीर शिवाजी, वीर रत्न बाजीप्रभू या ऐतिहासिक नाटकांचे पन्नासच्यावर प्रयोग केलेले आहेत. त्यांनी स्वराज्य रवी या नाटकाला दोन अंकात आणून या नाटकाच्या तालमींना सुरुवात केली आहे. लवकरच मुंबईत शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.
श्री महालक्ष्मी कला मंचने आपला सातवा वर्धापन दिन पवई येथे साजरा केला त्यानिमित्ताने स्वराज्य रवी या नाटकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण श्री सुभाष लाड यांच्या हस्ते केले.त्यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक श्री प्रकाश लाड, संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश मांडवकर, उपाध्यक्ष श्री आत्माराम बाचिम हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते श्री प्रदीप रेवाळे यांनी केले.