उपसरपंचपदाच्या संपूर्ण कार्यकाळातील मानधन दुष्काळग्रस्तांसाठी दान

परुळेबाजार उपसरपंच प्राजक्ता पाटकर यांचा आदर्शवत निर्णय!

परुळे : प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातून मदतीचे हात पुढे येत असतानाच, परुळे बाजार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. प्राजक्ता प्रसाद पाटकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्शवत निर्णय घेतला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, सौ. पाटकर यांनी आपल्या उपसरपंच पदाच्या संपूर्ण कार्यकाळात मिळणारे मानधन हे परुळेबाजार ग्रामपंचायत हद्दीतील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी मिळालेले मानधन ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केले असून, त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भातशेतीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून भविष्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या आवाहनानुसार जिल्हाभर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेअंतर्गत वनराई बंधारे उभारून जलसंधारणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच सामाजिक जाणिवेतून सौ. प्राजक्ता पाटकर यांनी आपल्या मानधनाचा वापर वैयक्तिक लाभासाठी न करता गावातील संकटग्रस्त बांधवांसाठी करण्याचे ठरवले आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.