लवकरच कोकण आयुक्तांकडे तक्रार करणार
वेंगुर्ले : प्रतिनिधी
म्हापण गावातील खवणे येथील सीआरझेड (CRZ) परिसरात झालेली बांधकामे, घर क्रमांकांचे कथित गैरवापर आणि अनधिकृत बांधकामांना दिलेल्या परवानग्यांबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी सरपंच आनंद मधुकर गावडे यांनी म्हापण ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच याबाबत आपण लवकरच कोकण आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे श्री. गावडे यांनी सांगितले.
गावडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, खवणे येथील सीआरझेड परिसरातील काही इमारतींना तसेच घरांना दिलेले क्रमांक अज्ञात व्यक्तींनी ग्रामपंचायतीच्या मदतीने चोरून अन्य ठिकाणी वापरल्याचा आरोप आहे. संबंधित घर क्रमांकांचा वापर करून सरकारी नियम धाब्यावर बसवत नवीन बांधकामे करण्यात आली असून, त्यांना चोरीस गेलेले घर क्रमांक लावण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणात ग्रामपंचायतीने कारवाई करण्याऐवजी वाढीव बांधकामांचे आकारणी करून त्यांना रीतसर परवानगी दिल्याचा आरोपही गावडे यांनी केला आहे. तसेच नवीन इमारतींना नवीन क्रमांक देऊन मोठमोठी हॉटेल्स उभारण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
खवणे येथील सीआरझेड परिसरात मच्छीमार लोकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध होत नसताना, सीआरझेडच्या मर्यादांचे उल्लंघन करून काही ठिकाणी अवाढव्य इमारतींची नवीन बांधकामे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अनधिकृत बांधकामांना जुने घर क्रमांक लावणे, आकारणी व मोजमाप वाढवून चुकीच्या पद्धतीने परवानग्या देणे, अशा प्रकारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
म्हापण ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाशी संबंधित जागेतील तलाठी कार्यालयाच्या इमारतीला लागून ग्रामपंचायतीने शासकीय खर्चातून कोणत्याही खात्याची रीतसर परवानगी न घेता दोन खोल्या बांधल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. अशा प्रकारे चुकीचे निर्णय घेऊन ग्रामपंचायतीने मनमानी कारभार केला आहे.
या सर्व प्रकरणांची तत्काळ चौकशी व्हावी. या प्रकरणासंदर्भात ठोस पुरावे आपल्याकडे आहेत. तक्रारीचे निराकरण न झाल्यास जिल्हाधिकारी, कोकण आयुक्त, महाराष्ट्र शासन तसेच संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यासह उच्च न्यायालयात खटला दाखल करण्याचा इशाराही गावडे यांनी दिला आहे.












