सावंतवाडीत रात्रीच्या वेळी चप्पल दुकानाला भिषण आग 

 

बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या सतर्कतेने टळला अनर्थ

 

सावंतवाडी : येथील बाजारपेठेत मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत संजीव शु वेअर हे चप्पलाचे दुकान जळून लाखोंचे नुकसान झाले आहे. मात्र, बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून, संपूर्ण बाजारपेठ आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचली आहे.

पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले असून, यात दुकानातील बहुतांश माल पूर्णपणे जळून खाक झाला आहे. शेजारील सलून दुकानातील व्यक्तीस या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ बाजारपेठ नवरात्रोत्सव मंडळाच्या मंडपात असलेल्या कार्यकर्त्यांना याची कल्पना दिली. माहिती मिळताच २० ते २५ कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

सुदैवाने, नंदू गांवकर हे मंडळातच वस्तीला असल्याने त्यांनी तात्काळ पालिकेचा बंब घटनास्थळी आणला, ज्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. अन्यथा, आगीने रौद्ररुप धारण करून बाजारपेठेतील इतर दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती. या दुर्घटनेत संजू निपाणीकर यांच्या चप्पलाचे दुकान जळून लाखोंचे नुकसान झाले आहे.

या संकटसमयी आग आटोक्यात आणण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर, राजू धारपवार, रामा गावडे, अर्चित पोकळे, चिरायू टोपले, सुरेश वाडकर, श्री. मुळीक, प्रसाद देऊलकर, देवबा देऊलकर, जुगनू देईलकर, शैलेश गवंडळकर, प्रसाद वागळे, राकेश चितारी, श्री. चितारी आणि अमित वेंगुर्लेकर यांच्यासह मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते. बाजारपेठेतील नवदुर्गेमुळेच संपूर्ण बाजारपेठ वाचली, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.