कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे मुख्य अभियंत्यांना सुचना
आ. शेखर निकम यांच्या विनंतीची दखल
चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे शासकीय मत्स्यबीज केंद्र उभारणीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची चिन्हे आहेत. या केंद्रासाठी प्रस्तावित असलेली जागा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्या अखत्यारीत असल्याने, ती मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी, अशी आग्रही विनंती आमदार शेखर निकम यांनी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. आ. शेखर निकम यांच्या विनंतीची दखल घेत ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संबंधित पत्रावर सकारात्मक शेरा नोंदवला असून, कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्य अभियंत्यांना दिले आहेत. त्यामुळे पिंपळी खुर्द येथील शासकीय मत्स्यबीज केंद्राच्या उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
चिपळूण तालुक्यात शासकीय मत्स्यबीज केंद्र उभारण्यासाठी सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयामार्फत तीन जागांची पाहणी करण्यात आली होती. या पाहणीत मौजे पिंपळी खुर्द येथील गट क्रमांक २१ मधील जागा प्राथमिकदृष्ट्या सर्वाधिक योग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. या जागेवर केंद्राच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली वीजपुरवठ्याची सुविधा, वर्षभर पाण्याची उपलब्धता आणि मुख्य जोडरस्त्याची सोय उपलब्ध आहे. तसेच, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथील तज्ज्ञांच्या अहवालानुसार येथील पाणी मत्स्यबीज केंद्रासाठी योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या जागेवर केंद्र उभारल्यास मत्स्यव्यवसायाच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. सदर जागा सध्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यारीत असल्याने, ती मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी जलसंपदा मंत्रीमहोदय राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे मागणी केली होती. या पत्रातून जागा हस्तांतरणाच्या प्रक्रियेला गती मिळावी आणि संबंधित स्तरावर आवश्यक कार्यवाही व्हावी, अशी विनंती त्यांनी केली. या मागणीची दखल घेत मंत्री महोदयांनी पत्रावर सकारात्मक शेरा नोंदवून मुख्य अभियंत्यांना जागा हस्तांतरणाबाबत पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रस्तावाच्या प्रशासकीय प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी सकारात्मक हालचाल सुरू झाली आहे.
पिंपळी खुर्द येथे शासकीय मत्स्यबीज केंद्र उभारल्यास स्थानिक मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन मिळण्यासह मत्स्यबीज उपलब्धतेच्या दृष्टीनेही फायदा होऊ शकतो. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आ. शेखर निकम यांनी केलेला पाठपुरावा आणि जलसंपदा मंत्री मंत्रीमहोदय राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलेले सकारात्मक निर्देश यामुळे पुढील प्रशासकीय कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













