दहा दिवसात हप्ते न मिळाल्यास स्वातंत्र्य दिनी उपोषण
मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांचा इशारा
चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील शिव खुर्द-सुतारवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ४ ते ५ लाभार्थ्यांची घरे मंजूर झाली. सहा महिन्यापूर्वी लाभार्थ्यांनी स्वतःची घरे जमिनदोस्त करत नवीन घरे बांधण्याचे काम हाती घेतले. मात्र, या लाभार्थ्यांना घरांचे हप्तेच दिले नसल्याने घरे रखडली आहेत. येत्या १० दिवसात लाभार्थ्यांना घरांचे हप्ते अदा न केल्यास १५ ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांसमवेत उपोषण छेडण्याचा इशारा मनसेचे माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी दिला आहे.
घरांचे हप्ते मिळण्यासाठी लाभार्थी पंचायत समितीत खेटे घालत आहेत. स्वतःची घरे उद्ध्वस्त केल्यापासून लाभार्थी शेजारी तसेच नातेवाईकांकडे आश्रयाला आहेत. मात्र, घरांचे हप्तेच अदा केले नसल्याने लाभार्थ्यांची कोंडी झाली आहे. शेजारी अथवा नातेवाईकांकडे किती दिवस आसरा घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निधी उपलब्ध झाला नसल्याचे उत्तर लाभार्थ्यांना अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे. निधीच नव्हता तर घरे मंजूर का केली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. भर पावसात लाभार्थी इतरांकडे आश्रयाला आहेत. ६ महिने लोटून देखील अद्याप लाभार्थ्यांना हप्ते देण्यात आलेले नाहीत.
या पार्श्वभूमीमवर प्रशासनाला खडबडून जागे करण्यासाठी उपोषणाचा मार्ग पत्करण्याचा निर्णय लाभार्थ्यांनी घेतला आहे. हप्ते अदा करण्यासाठी १० दिवसाची ‘डेडलाईन’ दिली आहे. याकालावधीत निश्चित कार्यवाही न झाल्यास उपोषणावर ठाम राहणार असल्याचे लाभाथ्यांचे म्हणणे आहे.












