अवैध गावठी दारूविक्रीविरोधात पोलिसांची कारवाई, शृंगारतळी व जानवळे येथे गावठी दारू जप्त, दोघांवर गुन्हे दाखल

गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यात अवैध गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. जानवळे मधलीवाडी आणि शृंगारतळी परिसरात १३ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुहागर तालुक्यातील जानवळे मधलीवाडी येथे १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.५० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. प्रविण कृष्णा कानसे (वय ६३, रा. जानवळे मधलीवाडी, ता. गुहागर) यांच्या राहत्या घराशेजारी असलेल्या खोपटीत विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रितेश परशराम रहाटे यांनी फिर्याद दिली असून, गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३६ वाजता करण्यात आली.
दुसरी कारवाई शृंगारतळी येथील पेट्रोलपंपालगत असलेल्या पडक्या चाळीच्या मागील बाजूस करण्यात आली. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास रुपेश शंकर टाणकर (वय ४७, रा. पालपेणे तळ्याचीवाडी, ता. गुहागर) यांच्याकडे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या कारवाईत एकूण ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू, अंदाजे ५५० रुपये किमतीची, जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल रमेश पवार यांनी फिर्याद दिली असून, गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.१० वाजता झाली.
गुहागर तालुक्यातील या दोन्ही कारवायांमुळे विनापरवाना गावठी दारू बाळगण्याच्या प्रकारांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.