शनिवारी १७ ऑक्टोबर होणार मोफत तज्ञ ओपीडीचा शुभारंभ
लांजा (प्रतिनिधी): रत्नागिरी येथील श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा विस्तार करण्यात आला असून तालुक्यातील सापुचेतळे येथे शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी मोफत तज्ञ ओपीडीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे उपस्थित राहणार आहेत.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने रत्नागिरी येथे भगवान महादेव सांबरे रुग्णालयाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. लांजा तालुक्यातील सापुचेतळे या ठिकाणी संस्थेचे जनसंपर्क कार्यालय असून याच ठिकाणी आता सापुचेतळे परिसरातील गोरगरीब रुग्णांसाठी १७ ऑक्टोबर पासून मोफत तज्ञ ओपीडी सुरू केली जाणार आहे.
सोमवार ते शनिवार दुपारी ४.०० ते सायंकाळी ६.०० यावेळेस रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना दर्जेदार तज्ञ वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिजाऊ संस्थेचे लांजा तालुका अध्यक्ष योगेश पांचाळ यांनी केले आहे.













