ग्रामदेवता मंदिरात सापडलेली मोबाईल व पैशाने भरलेली पर्स केली परत

मधुकर सांगळे यांचा प्रामाणिकपणा

गुहागर । प्रतिनिधी :
तळवली ग्रामदेवता श्री सुकाईदेवी मंदिरात आलेल्या भाविकांची मोबाईल व पैशाने भरलेली पर्स ग्रामदेवता मंदिराचे गावकर मधुकर सांगळे यांनी त्या भाविकांना देत प्रामाणिकपणा जोपासला आहे.
तळवली ग्रामदेवता श्री सुकाई देवी मंदिरात भक्तगण दर्शनासाठी येत असतात येथील मंदिरात गावकर म्हणून काम पाहणारे मधुकर सांगळे हे संद्याकाळी नेहमी प्रमाणे दिवाबत्ती व मंदिर बंद करत असताना त्यांना मंदिरात पर्स दिसून आली.याठिकाणी दर्शनासाठी आलेले भक्त ही पर्स विसरून गेलेले असावेत असे त्यांनी जाणले. आणि ती पर्स आपल्याकडे सुखरुप ठेवली व कोणीतरी मंदिरात पर्स शोधत येईल म्हणून खूप वाट पाहिली.
यानंतर कोणीच मंदिरात पर्सच्या शोधात आले नाही व मोबाईल वर फोन सुद्धा आला नाही म्हणून त्यांनी ग्रामदेवता देवस्थान कमिटी सचिव यांना याबाबत माहिती दिली व सदर पर्स त्यांच्या ताब्यात दिली.
त्यानंतर थोडया वेळाने पर्समधील मोबाईल वर फोन आला व सदरची पर्स ही विश्वनाथ कांबळे तळवली यांच्या पत्नीची असल्याचे समजले. ते मंदिरात दर्शनाला आले असता पर्स विसरले होते
सदर पर्समध्ये असलेली रोख रक्कम 4270/- व मोबाईल श्री कांबळे यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली आहे. दरम्यान मधुकर सांगळे यांच्या या प्रामाणिकपणामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.