मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडून कौतुक
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदतीचा हात देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव ठेवून सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्वागत केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.
राज्यात दुष्काळाचे गंभीर संकट उभे राहिले असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जवसुलीच्या तगाद्यातून दिलासा, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे, असे प्रभाकर सावंत यांनी म्हटले आहे.
शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी दुष्काळाचा काळ अत्यंत कठीण असतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता दर्शवतो. पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी आणि कृषी क्षेत्रासाठीच्या विविध योजनांच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाणी, पीक आणि चारा नियोजनावर भर देण्यात येत असल्याचे सावंत यांनी नमूद केले.
दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी शासन, प्रशासन आणि शेतकरी यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. या काळात शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनांना सहकार्य करून दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही प्रभाकर सावंत यांनी केले.












