किंजवडे येथे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम

“शाळा तिथे दाखला – सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत १५८ प्रमाणपत्रांचे वाटप

शिरगाव (प्रतिनिधी)    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या “शाळा तिथे दाखला – सेवा पंधरवडा” या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून प्रमाणपत्र (दाखला) वितरण कार्यक्रम किंजवडे ग्रामपंचायत सभागृहात उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. संतोष किंजवडेकर सरपंच, किंजवडे यांनी भूषवले.हा कार्यक्रम दिनांक १४ ऑक्टोबर २०२५, मंगळवार रोजी सकाळी ११:३० वाजता संपन्न झाला. या प्रसंगी एकूण १५८ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाचला. दाखले वेळेत उपलब्ध झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकवर्गाने विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमात सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.

यावेळी उपसरपंच श्री. विनय पाडावे, पोलीस पाटील श्री. गुरुनाथ मिठबावकर, ग्राम महसूल अधिकारी श्री. अमित झाडे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. हनुमंत तेरसे, सदस्य श्री. प्रविण तेली, श्री. गणेश जोईल, श्रीमती वृषाली तळवडेकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हनुमंत तेरसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. गोविंदराव जाधव यांनी केले.