ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
गुहागर/ प्रतिनिधी : तळवली परिसरात बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या संभाव्य हालचालींमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, शेतात काम करणारे शेतकरी, गुरे चारण्यासाठी जाणारे ग्रामस्थ तसेच सकाळी आणि संध्याकाळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तळवली शिगवणवाडीमध्ये परिसरातील काही कुत्रे या बिबट्याने गायब केले आहेत.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने परिसरात पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा शोध घेतला मात्र यावेळी त्यांना बिबट्याचे दर्शन घडले नाही, त्यांनी तेथील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत माहिती दिली. बाहेर जाताना हातात काठी व बॅटरी घेऊनच बाहेर पडावे असेही सांगितले. बिबट्याच्या वावराबाबत नागरिकांना योग्य माहिती देऊन सतर्कतेच्या सूचना दिल्या.













