मातीकाम कला विश्व ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी साकारल्या १३० हून अधिक कलाकृती

मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व सर्जनशीलता वाढवण्यासाठी उपक्रमाचे आयोजन
भाऊसाहेब महाडिक सभागृहात भरवले प्रदर्शन

चिपळूण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दर शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम उत्साहात राबविला जातो. याच उपक्रमाचे औचित्य साधून सकाळ सत्रातील इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मातीकाम’ या उपक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांच्या हातातून काहीतरी सर्जनशील कृती घडावी, हा यामागील मुख्य उद्देश होता.
या उपक्रमात इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुलांमध्ये सहकार्य व सांघिक भावना वाढीस लागावी, यासाठी विद्यार्थ्यांनी गटागटामध्ये आपापसात चर्चा करून काय बनवावे याचे नियोजन केले. माती हाताळताना विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. रंगीबेरंगी आणि चिकणमातीचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेची सुंदर चुणूक दाखवली. विविध प्रकारच्या १३० हून अधिक वस्तूंची निर्मिती विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून अनेक आकर्षक वस्तू तयार केल्या. यामध्ये प्रामुख्याने श्री गणपती बाप्पाची मूर्ती, विविध प्रकारची फळे, भाज्या, प्राणी व पक्षी, शंकराची पिंडी, मातीची भांडी, चुली, मडके, ताटल्या आणि आकर्षक पणत्या अशा सुमारे १३० हून अधिक वस्तूंचा समावेश होता. भाऊसाहेब महाडिक सभागृहात कौतुक विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्व कलाकृती विद्यालयाच्या भाऊसाहेब महाडिक सभागृहात प्रदर्शनासाठी मांडण्यात आल्या होत्या.
विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय व पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन प्रत्येक गटाच्या कलाकृतीचे विशेष कौतुक केले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. मातीकामासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची कल्पकता, सर्जनशीलता आणि हस्तकौशल्ये विकसित होण्यास मदत होते, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या यशस्वी उपक्रमाचे आयोजन व नियोजन सौ. ज्योती निकम यांनी केले होते. यावेळी सकाळ सत्रातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.