मठ येथे बांधण्यात आला बंधारा, मठ ग्रामपंचायत, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग

आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती

संतोष कोत्रे
लांजा : मिशन बंधारे – एक दिवस बंधाऱ्यासाठी’ या उपक्रमांतर्गत आज शुक्रवारी मठ येथे बंधारा बांधण्यात आला.‌ मठ ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थ यांचा यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.‌ या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार, ‘मिशन बंधारे – एक दिवस बंधाऱ्यासाठी’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत मठ ग्रामपंचायतीच्या वतीने बंधारा बांधणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, लांजा‌ पंचायत समिती सभापती सौ. मानसी आंबेकर, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, जिल्हा परिषद सदस्य संतोष रेवाळे, पंचायत समिती सदस्या सौ. दीपाली दळवी, गटविकास अधिकारी श्री. गिरी, विभागप्रमुख अल्ताफ काझी, उपविभागप्रमुख गुरुप्रसाद पवार, विस्तार अधिकारी संजय लोखंडे व संजय कुंभार‌ हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार किरण सामंत म्हणाले की, संभाव्य पाणीटंचाई टाळायची असेल तर बंधारे बांधणे ही काळाची गरज आहे. याचबरोबर प्रत्येक नागरिकाने पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. जल है तो कल है ही बाब लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वाहाळावर बंधारा बांधण्यात आला.‌ या बंधाऱ्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. यावेळी मठ ग्रामपंचायतीच्या प्रशासक सौ. स्वाती पाटील, ग्रामसेवक श्री. गमरे, शाखाप्रमुख दीपेश कडू, दिलीप पानकर, संतोष अडबल, हेमंत मोघे,संध्या पांचाळ, सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जलसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.