राजापूर नगर वाचनालनात वाचन प्रेरणा दिन साजरा
डॉ. श्रीकांत मलातपुरे, सोनी एडके, कु. प्रणव मोंडे यांचा उत्तम वाचक पुरस्काराने सन्मान
राजापूर (वार्ताहर): भगवान परशुराम हे भगवंताचे सहावे अवतार होते. त्यांचे दैवत्व बाजुला ठेवले तरी त्यांनी केलेले काम हे महत्वपुर्ण आहे. ते समाजाला दिशा देणारे आहे. म्हणून त्यांना नवनिर्मितीचे ऋ षी म्हटले पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, अभ्यासक आणि उद्योजक डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी येथे केले.
नगर वाचनालय राजापूरच्या वतीने गुरूवारी नगर वाचनालय सभागृहात आयोजित वाचन प्रेरणा दिन आणि उत्तम वाचक पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी डॉ. पटवर्धन यांनी भगवान परशुरामांच्या जीवनपटाचा अत्यंत साक्षेपी, चिकित्सक आणि संशोधनात्मक विचार मांडले. तर नगर वाचनालय राजापूर तर्फे उत्तम वाचक घडविण्याचे काम उत्तम रितीने सुरू असल्याचे गौरवोद्गारही काढले.
याप्रसंगी व्यासपीठावर कवी प्रमोद जोशी, वाचनालयाचे अध्यक्ष प्रभात पाध्ये, कार्यवाह जयंत अभ्यंकर, मालती गोंडाळ आदी उपस्थित होत्या. यावेळी कै. बी. के. गोंडाळ व मानसी हजेरी यांच्या आर्थिक सहयोगातून दिला जाणारा कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार डॉ. श्रीकांत मलातपुरे, सोनी एडके यांना तर नगर वाचनालयाचा उत्तम बालवाचक पुरस्कार कु. प्रणव सं. मोंडे याना डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रारंभी पाहुण्यांचा परिचय कार्यवाह जयंत अभ्यंकर यांनी करून दिला. तर कवी प्रमोद जोशी यांनी डॉ. पटवर्धन यांच्या जीवनावर कविता सादर केली. सूत्रसंचालन ग्रंथपाल पद्मजा कारेकर यांनी तर आभार लिपीक साईशा पडयार यांनी मानले. प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी आपला विषय मांडताना डॉ. पटवर्धन यांनी आपली परंपरा परशुरामांना विष्णुचा सहावा अवतार मानते. परंतु परशुरामांच्या बाबतीत ते मातृहत्यारा आहेत आणि क्षत्रीय हत्यारा आहेत अशी विरोधाभासी प्रतिमा उभी केली गेली आहे. परशुराम म्हणजे राग, संघर्ष, शस्त्र आणि युध्द असे समजले जाते परंतु त्यांचा उद्देश विनाशाचा नव्हता तर पुर्ननिर्मितीचा होता. पुढच्या काळात त्यांनी आचार्य परंपरा सुरू केली. कोकण भूमीची निर्मीती करून समताधिष्टीत समाज रचना निर्मितीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. जे अधर्मी होते त्यांना शिक्षा करून धर्माधिष्टित समाज व्यवस्थेला त्यांनी प्रोत्साहन दिले. म्हणून पारंपरिक पौराणिक समजुतींच्या पलीकडे जाऊन भगवान परशुरामांचे कार्य समजून घेतले पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी वाचनालयाचे संचालक सुहास ओळकर, शैलेश आंबेकर, श्रृती ताम्हनकर, दर्शना मांडवकर यांसह सहा. ग्रंथपाल अनघा करंदीकर, अनिकेत नाडणकर आदींसह विद्यार्थी वाचक, सभासद उपस्थित होते. यावेळी पुरस्कार विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.













