वाचन प्रेरणा दिनानिमित्त इयत्ता सहावी ‘ड’चा अभिनव उपक्रम
स्वरा धावडे व तेजल चव्हाण यांना ‘वाचक वीर’ पुरस्कार
चिपळूण (प्रतिनिधी) : भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी साजऱ्या करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावी ‘ड’च्या विद्यार्थ्यांनी अभिनव ‘वर्ग ग्रंथालय’ उपक्रम सुरू केला. मुख्याध्यापक वारे सर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि पुस्तकांशी मैत्री दृढ व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी स्वतःच्या संग्रहातील कथा, कविता, बोधकथा, विज्ञानकथा आणि थोर व्यक्तींची चरित्रे अशी ७८ हून अधिक पुस्तके एकत्र करून वर्गातच ग्रंथालय साकारले. या ग्रंथालयाचे व्यवस्थापन आणि पुस्तकांची देवाणघेवाण करण्यासाठी विद्यार्थ्यांमधूनच ‘बाल ग्रंथपाल’ निवडण्यात आला आहे. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले, तसेच डॉ. कलाम यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग कथन केले. डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व कायम असून, डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्याचा वाचन हा उत्तम मार्ग असल्याचे ग्रंथपाल अनुष्का काजोलकर यांनी सांगितले. ‘वाचक वीर’ पुरस्काराने विद्यार्थ्यांचा गौरव वर्षभरात सर्वाधिक आणि विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘वाचक वीर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये कु. स्वरा संतोष धावडे (इयत्ता आठवी ‘ड’) आणि कु. तेजल सुरेश चव्हाण (इयत्ता सहावी ‘ड’) यांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी दररोज किमान १५ मिनिटे अवांतर वाचन करण्याचा आणि वर्षभरात किमान दहा पुस्तके वाचण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांच्या या कल्पक उपक्रमाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण पर्यवेक्षक महेश कुलकर्णी शिक्षकवृंद आणि पालकांनी विशेष कौतुक केले.












