वनराई बंधारे उभारण्यासाठी २९०० पिशव्या पंचायत समितीकडे सुपूर्द
वैभववाडी l प्रतिनिधी : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या उद्देशाने वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेने पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री ना. नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी संघटनेच्या वतीने वनराई बंधारे उभारण्यासाठी २९०० पिशव्या पंचायत समिती वैभववाडी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरतात. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने प्रशासनाकडून वनराई बंधारे उभारण्याचे आवाहन करण्यात आले होते. या उपक्रमाला प्रतिसाद देत वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत सहकार्य केले आहे.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी स्नेहा माने, प्रशासन अधिकारी संतोष टक्के, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष तेजस आंबेकर, तसेच मनोज सावंत, संतोष कुडाळकर, लवू पारकर, रवी सांगवेकर, वसंत पटेल, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.
जलसंधारणाच्या कामांसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ यांनी वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेचे आभार मानले. पाणीटंचाईचा प्रश्न गांभीर्याने घेत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे राबविणे ही काळाची गरज असून, व्यापारी संघटनेच्या या योगदानामुळे बंधारे उभारणीच्या मोहिमेला बळ मिळणार आहे.













