गुरुकुल कॉलेज, खेर्डी येथे ‘जागर आरोग्याचा- मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ व ‘सेवा संकल्प अभियान’

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुका आरोग्य कार्यालय, चिपळूण अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, अडरे यांच्या वतीने गुरुकुल कॉलेज, खेर्डी येथे ‘जागर आरोग्याचा- मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ व ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र, अडरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. यतीन विलास मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी समुपदेशक जहूर बोट यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, आत्महत्या प्रतिबंध, निरोगी जीवनशैली, युवकांचे सर्वांगीण आरोग्य आणि त्वचारोग या विषयांवर मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. व्यसनांपासून दूर राहणे, तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. तसेच मानसिक तणाव किंवा नैराश्य जाणवत असल्यास योग्यवेळी मदत घेण्याचे आणि आत्महत्येचे विचार येत असल्यास विश्वासू व्यक्ती अथवा तज्ज्ञांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना आरोग्यविषयक शपथ देण्यात आली. या उपक्रमाला गुरुकुल कॉलेजमधील सुमारे ६० विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास आरोग्य निरीक्षक श्री. महाडिक, आरोग्य सेवक श्री. सोनवणे, श्री. परमार, श्री. पाटील तसेच आशा सेविका श्रीमती घाग उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, आरोग्यदायी सवयी विकसित करणे आणि समाजात सकारात्मक आरोग्यविषयक दृष्टिकोन रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.