वाचन संस्कृतीचा जागर विद्यार्थ्यानी केली पुस्तक विश्वाची सफर
चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक विद्यार्थी दिन विविध शैक्षणिक व नावीन्यपूर्ण उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, वाचन संस्कृती रुजविणे, ज्ञानाची व्याप्ती वाढविणे आणि पुस्तकांशी मैत्री दृढ करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन शाळेचे मुख्याध्यापक श्री सकपाळ सर, शिक्षकवृंद व महात्मा जोतीबा फुले यांची वेशभूषा केलेला विद्यार्थी सात्विक अविनाश देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत प्रकट वाचन, मूक वाचन, ई-वाचन आणि संवादात्मक वाचन यांसारख्या विविध वाचन पद्धतींची प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे वाचनात सहभाग घेत विविध पुस्तकांतील गोष्टी, माहितीपूर्ण लेख आणि प्रेरणादायी साहित्य यांचा आनंद घेतला.विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी ‘पुस्तकांचे झाड’, ‘फिरते ग्रंथालय’, ‘वाचू आनंदे’, ‘पुस्तक आपल्या दारी’, ‘वाचन कट्टा’ आणि ‘वाचकवीर पुरस्कार’ यांसारखे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. विद्यालयाने विद्यार्थ्यासाठी ग्रंथालयामार्फत सहा हजार पुस्तके उपलब्ध केली आहेत . विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढावी आणि अधिकाधिक पुस्तके वाचण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी वाचकवीर पुरस्कार हा उपक्रम प्रत्येक महिन्याला राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत सर्वाधिक पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लहान गटातून कु. आयुष विजय रायकवाड आणि मोठ्या गटातून कु. आराध्या दिनेश कदम यांना वाचकवीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन इतर विद्यार्थ्यांनाही नियमित वाचनाची प्रेरणा मिळते. याप्रसंगी शिक्षिका विनया नटे यांनी आपल्या मनोगतातून वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. नियमित वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते, शब्दसंपत्ती वाढते, विचारशक्ती विकसित होते आणि कल्पनाशक्तीला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांसोबतच गोष्टींची पुस्तके, चरित्रे, विज्ञानविषयक पुस्तके आणि विविध माहितीपूर्ण साहित्याचेही नियमित वाचन करावेअसे आवाहन त्यांनी केले. विद्यालयात वर्षभर राबविण्यात येणारे वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट, शिक्षकांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट, ई-बुक गॅलरी, कात्रणे वाचन, भित्तीपत्रक आणि वाचनपेटी यांसारखे उपक्रमही विद्यार्थ्यांच्या वाचनविकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांतील साहित्याची ओळख होत असून, वाचन ही केवळ अभ्यासाची बाब न राहता आनंददायी सवय बनत आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ सरतसेच मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे,वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण, विजया मौजे, विनोद उदेग व एकनाथ चाळके यांनी विशेष परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांच्यात ज्ञानार्जनाची प्रेरणा जागविणारा हा कार्यक्रम विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.












