कोकणातून विदर्भात येऊन ज्ञानदान; पूर्वा करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांची भरारी
देवरूख (प्रतिनिधी):
रत्नागिरी जिल्ह्यापासून सुमारे बाराशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नागझिरा अभयारण्याच्या पायथ्याशी एका जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे देवरूख-माळवाशीची शिक्षिका पूर्वा प्रमोद करंडे. तिच्या मार्गदर्शनाखाली येथील आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थी विविध उपक्रम व स्पर्धेत केंद्र, तालुका, जिल्हा स्तरावर यश मिळवत आहेत.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या भजेपार येथील शाळेत पूर्वा यांची नियुक्ती मार्च 2023 साली झाली. गावापासून खूप अंतरावर ही शाळा असल्यामुळे सुरुवातीला शाळेत लक्ष लागायचे नाही. घरची आठवण यायची. मात्र हळूहळू इथल्या विद्यार्थ्यांमध्ये रमायला सुरुवात करत, विदर्भातले लोकजीवन अनुभवत त्याच्याशी जुळवून घेतले. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशीही शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तन-मन-धन अर्पण करून काम केले. शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून त्यातून विद्यार्थ्यांना शाळेबद्दलची आवड त्यांनी निर्माण केली. यामुळे शाळेची पटसंख्या वाढली. विद्यार्थी अनुपस्थिती आणि गैरहजेरीचे प्रमाण आपोआपच कमी झाले. शिस्तीचे वातावरण निर्माण झाले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवत दर्जेदार कार्यक्रम करण्यावर भर दिला. अटल क्रीडा महोत्सवात गीतगायन, समूह व वैयक्तिक नृत्य, लेझीम नृत्याची केंद्र व तालुका स्तरावरील प्रथम क्रमांकाची अनेक बक्षिसे पटकावली. जिल्हा स्तरावरही तिरोडा तालुक्याचे नेतृत्व भजेपार शाळेने केले.
इथल्या आदिवासी बांधवांची, शेतकरी-कष्टकऱ्यांची मुले तालुका, जिल्हा स्तरावरील स्पर्धेत चमकतात, हा आनंद माझ्यासाठी अधिक ऊर्जा देणारा आणि समाधान देणारा आहे. या मुलांमध्ये गुणवत्ता असते, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन व संधी देणे गरजेचे असते, अशी प्रतिक्रिया पूर्वा यांनी बोलताना दिली. ‘गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवताना येणाऱ्या समस्या’ याबाबतचा शोधनिबंध पूर्वा यांनी गेल्यावर्षी स्पर्धेत सादर केला होता. त्याला तालुका, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त होऊन राज्यस्तरासाठी त्याची निवड झाली होती. बांधीवरची शाळा, विदर्भातील पावसाळी रानभाज्या महोत्सव, आर्ट गॅलरी असे अनेक उपक्रम लक्षवेधी ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, ग्रामस्थ, व्यवस्थापन समिती, तालुक्यातील शिक्षक व अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळत असल्याचे पूर्वा सांगतात.
रत्नागिरी आणि गोंदिया या महाराष्ट्रातील दोन टोकातील विविधतेला सामोरे जात विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी योगदान देणाऱ्या या स्त्री शक्तीचे कार्य प्रेरणादायी ठरत आहे. कोकणातील संस्कारांची शिदोरी घेऊन विदर्भातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा पूर्वा करंडे यांचा प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय आहे. ‘स्वतःच्या जिल्ह्यात मिळाली तरच नोकरी करेन, अन्यथा नाही’, अशी मानसिकता कोकणातील अनेक डी.एड, बी.एड धारकांची दिसून येते. मात्र पूर्वा करंडे यांची संघर्षगाथा विचारात घेत नुकत्याच झालेल्या शिक्षक भरतीत कोकणातील अनेकांनी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आदिवासी विभाग असे जिल्हे नोकरीसाठी निवडले आहेत. कोकणातून बाहेर न पडणाऱ्यांसाठी ही संघर्षगाथा प्रेरणादायी बनली आहे.













