सावंतवाडीत बिहारी कामगाराची स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या

सावंतवाडी :
​सावंतवाडी शहराबाहेरील बाहेरचावाडा परिसरातील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या ३५ वर्षीय बिहारी सेंटरिंग कामगाराने घरातील स्वयंपाकाच्या चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. कृष्णा गोंड (रा. बिहार) असे मृत कामगाराचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरचावाडा येथील सरफराज ख्वाजा यांच्या घरात भाड्याने तीन बिहारी कामगार राहत होते. ते ठेकेदार अजयकुमार राय यांच्याकडे सेंटरिंगचे काम करतात. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे कामावरून परत आल्यावर मयत कृष्णा गोंड, कामगार अमित कुमार व सहकारी कामगार धर्मेंद्र यांच्यासोबत पैशांचा हिशोब करत होता. यादरम्यान अचानक कृष्णा उठून पाणी पिण्यासाठी आतील किचनच्या खोलीत गेला. काही वेळातच त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने इतर दोन्ही कामगारांनी आत जाऊन पाहिले असता, कृष्णा हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला आढळला.

​सहकारी कामगारांनी तातडीने त्याला टेम्पोत घालून उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या घरातील चाकूने मयताने स्वतःच्या गळ्यावर वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलिसांनी तो चाकू जप्त केला आहे.

​मृत कृष्णा गोंड हा अवघ्या वीस दिवसांपूर्वीच बिहारमधील सिवान येथून ठेकेदार अजयकुमार राय यांच्याकडे कामासाठी सावंतवाडीत आला होता. मात्र, तो गेल्या पाच दिवसांपासून अत्यंत विचित्र वागत होता आणि कोणाशीही बोलत नव्हता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी चौकशीसाठी इतर दोन्ही कामगार अमित कुमार आणि धर्मेंद्र यांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
​या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मयताचा शवविच्छेदन अहवाल शनिवारी प्राप्त होणार आहे. हा घातपात आहे की आत्महत्या, याचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे करत आहेत.