मंडणगडमध्ये उद्या युवासेनेच्या दांडिया नाईटला ‘व्हीएमपी बोलतो’ फेम विवेक पाटील यांची उपस्थिती!

शिवसेना पुरस्कृत ‘युवा सेना GenZ दांडिया आणि डीजे नाईट’चे आयोजन
गृहराज्यमंत्री योगेश कदम, सौ. श्रेयाताई कदम यांची प्रमुख उपस्थिती

खेड (प्रतिनिधी) : इंस्टाग्रामवर सध्या ‘व्हीएमपी बोलतो’ या खास वाक्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळवणारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विवेक पाटील उद्या, शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर रोजी मंडणगड येथे उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पुरस्कृत ‘युवासेना GenZ दांडिया आणि डीजे नाईट’ या भव्य कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या आगमनामुळे तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या वतीने मंडणगडमध्ये प्रथमच युवासेनेच्या माध्यमातून या दांडिया आणि डीजे नाईट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर आपल्या अनोख्या शैलीने तरुणाईचे लक्ष वेधून घेणारे विवेक पाटील यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडणगडकरांना मिळणार आहे. इंस्टाग्रामवर त्यांच्या ‘व्हीएमपी बोलतो’ या वाक्याने सध्या चांगलीच लोकप्रियता मिळवली असून, त्यांच्या चाहत्यांमध्येही या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे.

शनिवारी सायंकाळी ६ वाजता मंडणगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम रंगणार आहे. दांडियाच्या तालावर थिरकण्याची संधी आणि डीजेच्या संगीताची धमाल असा मनोरंजनाचा दुहेरी अनुभव या कार्यक्रमातून तरुणाईला मिळणार आहे. नवरात्रोत्सवाच्या उत्साहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मंडणगड परिसरातील नागरिक, युवक-युवती आणि दांडियाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाला नामदार गृहराज्यमंत्री योगेशदादा रामदास भाई कदम आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रेयाताई योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख श्री. प्रताप घोसाळकर, शिवसेना शहरप्रमुख श्री. विनोद जाधव आणि युवासेना तालुकाप्रमुख श्री. विकास पवार यांच्यासह आयोजकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे मंडणगडमध्ये शनिवारी सायंकाळी दांडिया आणि डीजेच्या तालावर रंगणाऱ्या या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.