वेंगुर्ले : प्रतिनिधी
उन्हाळ्यात भासणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि गावातील भूजल पातळी वाढवण्यासाठी अणसूर गावात ग्रामस्थांनी एकत्र येत लोकसहभागाचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. गेल्या १५ दिवसांत गावकऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन केलेल्या श्रमदानातून तब्बल २० कच्चे/वनराई बंधारे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांनी बंधाऱ्याच्या ठिकाणी भेट देत विशेष कौतुक केले आहे.
गावाला पाणीटंचाईपासून दूर ठेवण्यासाठी आणि पाण्याचा प्रत्येक थेंब जिरवण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून गावातील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी दिवस-रात्र मेहनत घेत होते. सामूहिक प्रयत्नांतून आणि श्रमदानातून गावातील विविध ओढ्या-नाल्यांवर २० बंधारे बांधण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आणि ग्रामस्थांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीषजी दळवी म्हणाले की, “शासकीय योजनांची वाट न पाहता ग्रामस्थांनी लोकसहभागातून जलसंधारणाचे हे मोठे काम उभे केले आहे. ‘जलसंधारणातून समृद्धीचा मार्ग’ कसा साध्य करता येतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. या उपक्रमामुळे गावातील विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी वाढून उन्हाळ्यात गावाला पाणीटंचाईची झळ बसणार नाही.” तसेच त्यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार मानले.
याप्रसंगी वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी सभापती श्री. शंकर घारे, पंचायत समिती सदस्य श्री आपा फणसेकर, सरपंच श्री. सत्यविजय, आरोग्य सेवक श्री. केरकर साहेब, श्री. महादेव गावडे, श्री. आनंद गावडे (बिट्टू) आणि ग्रामपंचायत अधिकारी सौ. सायली सातोसे उपस्थित होते.
तसेच या श्रमदानात व उपक्रमात श्री. दीपक गावडे, श्री. अर्जुन गावडे, श्री. बाळा मुळीक, श्री. कांता मुळीक, श्री. शैलू गावडे, श्री. चेतन गावडे, श्री. भाई गावडे, श्री. आनंद गावडे, श्री. देविदास गावडे, श्री. मेघशाम गाड, श्री. प्रभाकर गावडे, श्री. प्रकाश गावडे, श्री. योगेश गावडे, श्री. सीताराम गावडे (भाऊ) यांसह गावातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामस्थांच्या या एकजुटीचे आणि मेहनतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.













