अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व रत्नागिरी नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने ‘वरदाम : युवती संमेलन’चे आयोजन

रत्नागिरी :

युवतींमधील नेतृत्वगुणांना वाव मिळावा, त्यांच्या सामर्थ्याची जाणीव व्हावी आणि विविध क्षेत्रांत कार्य करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण रत्नागिरी आणि रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वरदाम : युवती संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे हे संमेलन होणार आहे. ‘सामर्थ्याची जाणीव, नेतृत्वाची उंच भरारी’ हे या संमेलनाचे ब्रीदवाक्य आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली देशव्यापी विद्यार्थी संघटना आहे. युवतींना प्रेरणादायी व्यक्तींची संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देणे आणि सामाजिक जीवनातील सहभाग वाढविणे, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाच्या उद्घाटन सत्रात रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती शिल्पा सुर्वे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्रुजा यादव, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पा पटवर्धन आणि देवगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा श्रीमती नेहा जोशी यांची उपस्थिती नियोजित आहे.

संमेलनातील परिसंवादात विद्यार्थी नेतृत्वाच्या क्षेत्रातून कु. श्रावणी प्रभू महाजन, उद्योगक्षेत्राच्या क्षेत्रातून श्रीमती स्वरूपा सरदेसाई आणि सोशल मीडिया व कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातून कु. कस्तुरी शेख सहभागी होणार आहेत. त्यांच्या अनुभवातून युवतींना विविध क्षेत्रांतील संधी, आव्हाने आणि नेतृत्वाच्या वाटचालीविषयी मार्गदर्शन मिळणार आहे.

या संमेलनात मार्गदर्शनपर सत्रे, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून युवतींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील इयत्ता ११ ते १२ च्या युवतींसाठी हे संमेलन खुले असून, सुमारे ७०० युवतींच्या सहभागाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी विविध महाविद्यालयांशी संपर्क साधण्यात येत असून नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

युवतींनी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होऊन विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मार्गदर्शन घ्यावे आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा तपशील :

कार्यक्रम : वरदाम – युवती संमेलन
दिनांक : सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६
वेळ : सकाळी ९ ते दुपारी २
स्थळ : सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
आयोजक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण रत्नागिरी व रत्नागिरी नगर परिषद