रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त

मुरुगवाडा येथील कारवाईत २८ हजार ७१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी शहर परिसरात पेट्रोलिंग करत असताना रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुरुगवाडा दांडा फिशरीजच्या मागे, वरचीवाडी येथे कारवाई केली.यावेळी गोवा बनावटीची विविध ब्रँडची दारू विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात बाळगल्याप्रकरणी एका 60 वर्षीय वृद्धाला ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई शुक्रवार 16 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
प्रशांत शिवराम नागवेकर (60, रा. मुरुगवाडा, भैरी मंदिराच्या मागे, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून एकूण 28 हजार 712 रुपये किमतीचा गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अरांक्षा यादव (भा.पो.से.), परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या प्रकरणी संबंधित इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९५१ च्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
या कारवाई पथका मध्ये पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार शांताराम झोरे, अमोल भोसले, भालचंद्र मयेकर, पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.