वर्दे येथे महाविद्यालयीन युवतीचा चाकूने वार करून खून!

आरोपीच्या शोधासाठी जिल्ह्यात नाकाबंदी; सहा पोलीस पथके तैनात

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओरोस खुर्दनजीकच्या वर्दे गावात शनिवारी सायंकाळी एका २५ वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे. आरोपीला पकडण्यासाठी सहा पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

संबंधित युवती हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिच्यावर चाकूने वार करून खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी प्रयत्न सुरू आहेत.
एका महाविद्यालयीन युवतीचा खून करून आरोपी फरार झाल्याच्या घटनेमुळे सिंधुदुर्ग पोलिसांसमोर या खुनाच्या तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. या गंभीर गुन्ह्याची जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गंभीर दखल घेतली असून तात्काळ तपास काम सुरू केले आहे. ओरोस जिजामाता सर्कल वर तात्काळ नाकाबंदी सुरू केली आहे.

या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.