रत्नागिरी : प्रतिनिधी
गेल्या तब्बल ३४ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या दोन सराईत फरार संशयित आरोपींना जेरबंद करण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला अभूतपूर्व यश आले आहे. 17 ऑक्टोबर रोजी कर्नाटक राज्यातील हुन्सूर परिसरातून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित ‘RAIDS App’ या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे या अत्यंत जुन्या आणि क्लिष्ट प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
मधुराज पुटरंग पहाडी राजपूत व सुब्रमणी चींनाराजू पहाडी राजपूत (दोन्ही रा.हन्सूर पक्षी राजपूर,कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. मंडणगड पोलीस ठाण्यात सन १९९२ मध्ये या दोघांवरही भारतीय दंड विधान कलम ४२९, २८६ आणि स्फोटक पदार्थ अधिनियम कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील हे दोन्ही संशयित आरोपी गेल्या ३४ वर्षांपासून स्वतःची ओळख लपवून पोलिसांना गुंगारा देत होते.
‘RAIDS App’ मुळे लागला छडा
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने १५ डिसेंबर २०२५ रोजी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘RAIDS App’ विकसित केले आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या ॲपच्या साहाय्याने फरार किंवा हरवलेल्या व्यक्तींच्या जुन्या छायाचित्रांचे तब्बल १०८ वेगवेगळ्या तांत्रिक पद्धतींनी पुनर्निर्माण करता येते. या प्रकरणातही आरोपींचे ३४ वर्षांपूर्वीचे जुने चेहरे आधुनिक तंत्रज्ञानाने अपडेट करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा आजचा संभाव्य चेहरा कसा असेल याचा अंदाज पोलिसांना आला. या डिजिटल रेखाचित्रांच्या आधारे तसेच स्थानिक व गोपनीय माहितीच्या मदतीने पोलिसांनी हुन्सूर (कर्नाटक) येथे सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकल्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि पोलिसांच्या सातत्यपूर्ण तपासामुळे 34 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यात यश आले आहे.
ही धडक कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकातील पोलिस हवालदार विनायक राजवैद्य, सवाईराम, कदम व शेटे यांना केली.












